महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निराशेतून उभारी घेत शेतकरी महिला बनली 'ड्रोन पायलट'; 'ड्रोन दीदी'ची थक्क करणारी यशोगाथा - Drone Pilot Woman

Drone Pilot Woman : पतीच्या अकाली निधनानंतर खचून गेलेल्या महिलेनं पुन्हा उभारी घेत ड्रोन पायलट होण्याचा निर्धार केला. त्यामुळे शेतकऱ्यांनी ड्रोन फवारणीला चांगला प्रतिसाद दिल्यानं त्यांना शाश्वत रोजगार मिळाला. या शेतकरी महिलेची ड्रोन दीदी होण्याची ही यशोगाथा खास आमच्या 'ईटीव्ही भारत'च्या वाचकांसाठी आम्ही देत आहोत.

Drone Pilot Woman
ड्रोन दिदी (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 24, 2024, 6:24 PM IST

Updated : Sep 24, 2024, 7:55 PM IST

अहमदनगर Drone Pilot Woman :संगमनेर तालुक्यातील मालदाड इथल्या शेतकरी महिलेनं शेतकऱ्यांसाठीच काम करण्याचा निर्धार करत ‘ड्रोन पायलट’ म्हणून ओळख निर्माण केली. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी, या दृष्टीकोनातून कमी वेळात कमी खर्चात औषधाची बचत व्हावी, यासाठी ड्रोन फवारणी त्या करुन देत आहेत. यामुळे त्यांना शाश्‍वत रोजगार देखील मिळाला असून सध्या त्यांच्याकडं ड्रोन फवारणीला मागणी वाढली आहे. मात्र या यशामागील त्यांचा प्रवासही तेवढाच खडतर आहे. सुप्रिया नवले असं या ‘ड्रोन पायलट’ शेतकरी महिलेचं नाव आहे.

शेतकरी महिला ते ड्रोन दीदीपर्यंतचा प्रवास :संगमनेर तालुक्यातील मालदाड इथल्या जिद्दी शेतकरी महिला सुप्रिया नवले यांनी बीएस्सी अ‍ॅग्रीपर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर कुटुंबानं त्यांचं लग्न लावून दिलं. मात्र नशीबात पतीची साथ फार काळ नव्हती. लग्नानंतर अवघ्या चार वर्षात त्यांच्या पतीचं निधन झाल्यानं त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी परत माहेरची वाट धरली. अश्यात त्यांनी एका सीसीसी सेन्टरमध्ये नोकरी स्वीकारली. अश्यातच पी एम ड्रोन योजना सुरू झाली आणि सुप्रिया यांनी त्यासाठी अर्ज केला. या योजनेमुळं त्यांचं नशीब पालटलं. ड्रोन दीदी म्हणून त्यांची निवड झाली. त्यानंतर त्यांनी पुण्यात ड्रोन तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण घेतलं.

ड्रोन दिदी (Source - ETV Bharat Reporter)

पंतप्रधानांच्या 'या' योजनेमुळे पालटलं नशीब :पी एम ड्रोन योजना सुरू झाल्यानंतर सुप्रिया नवले यांनी नोव्हेंबर महिन्यात प्रशिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांना फेब्रुवारीमध्ये एका कंपनीकडून ड्रोन देण्यात आला. त्यासोबत एक इलेक्ट्रिक वाहन, जनरेटर, बॅटरी या वस्तू देण्यात आल्या. मात्र नवीन काम आणि शेतकऱ्यांना ही पारंपरिक पद्धतीनं पाठीवरील पंपावरुन पिकावर औषधं मारण्याची सवय असल्यानं सुरुवातीला ड्रोनद्वारे फवारणी करण्यास कोणी तयार होत नव्हतं. त्यामुळे अनेक प्रयत्नानंतर आणि जनजागृतीनंतर आता त्या शेतकर्‍यांच्या मागणीनुसार ड्रोनद्वारे पिकांवर कीटकनाशक, बुरशीनाशक आणि खतांची फवारणी करत आहेत.

ड्रोननं फवारणी करण्याकडं वाढला शेतकर्‍यांचा कल :शेतकर्‍यांची पिकांवर फवारणीची मागणी आल्यानंतर त्या आपली गाडी घेवून शेतावर जातात. तिथं क्षेत्र तपासून फवारणी करायची, त्या क्षेत्राचं मॅपिंग करुन घेतात. ऑटो मोडमध्ये अवघ्या 7 मिनिटांत 1 एकर क्षेत्राची फवारणी करतात. सध्या ग्रामीण भागातल्या शेतकर्‍यांसाठी हा कुतूहलाचा विषय बनला आहे. ऊस, मका या पिकांची उंची जास्त असते. पिकं कमरेच्या वर गेल्यावर त्यावर फवारणी करता येत नाही. याशिवाय साप, बिबट्या अशा प्राण्यांचाही धोका असतो. अशा स्थितीत ड्रोननं फवारणी करण्याकडं आता शेतकर्‍यांचा कल वाढू लागला आहे. परंतु ग्रामीण भागात ड्रोन वापरासमोर काही आव्हानंही आहेत, असं त्या सांगतात.

दहा मिनीटात ड्रोननं होते फवारणी :शेतकरी या आधी बॅटरी पंपानं फवारणी करत होते. एका पंपानं एक एकर क्षेत्रात 10 पंप फवारणी करावी लागत असे. त्याला साधारणतः चार तास लागत होते. मात्र आता ड्रोनद्वारे फवारणी केल्यास अवघ्या दहा मिनीटात काम होत आहे. पावसाळी वातावरण असलं तरीही अडचण येत नाही. ड्रोनद्वारे फवारणी केल्यास औषधाची आणि पाण्याची मोठी बचत होते.

केवळ 300 रुपयात फवारतात एक एकर शेत :एक एकर क्षेत्र फवारणीसाठी शेतकऱ्यांकडून सुप्रिया केवळ 300 रुपये घेतात. हा ड्रोन व्यवसाय सुरू करुन केवळ एक-दीड महिन्याचा कालावधी लोटला असून सध्या दिवसाला 4 ते 5 हजार रुपये सुप्रिया कमावतात. ड्रोनसारख्या तंत्रज्ञानातून पिकांवर येणार्‍या रोगाची सुरुवातीची लक्षणं ओळखून त्यावर वेळीच उपाय करता येईल. याद्वारे औषधाची बचत होऊन कमी मनुष्यबळात कमी वेळेत शेतीची कामं करता येत आहेत, असं ड्रोन चालक सुप्रिया नवले यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं आहे.

हेही वाचा :

  1. धुळे; अन् भूमिहीन शेतकरी महिला झाल्या आत्मनिर्भर
  2. पुण्यातील शेतकरी महिलेने लॉकडाऊन सक्तीला बनवली संधी, 30 गुंठ्यातून कमाविले 5 लाख रूपये
  3. आंब्यांसोबत इतर पिकांचीही भरभराट; शेतात चर खोदून अमरावतीच्या माजी महापौरांचा नवा प्रयोग - Agriculture News
Last Updated : Sep 24, 2024, 7:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details