काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार का? संजय राऊत म्हणतात... - nana patole likely Chief Minister
काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री पद हिसकावून घेण्याची भाषा होत असेल तर ती नाना पटोलेंच्या प्रतिमेला अडचणीत आणणारी असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Published : Sep 23, 2024, 1:14 PM IST
|Updated : Sep 23, 2024, 1:21 PM IST
मुंबई-राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. परंतु मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडी आणि महायुतीतही सुंदोपसुंदी दिसत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती निवडणुकीला सामोरे जाणार आहे, तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावर उद्धव ठाकरे दावा करीत असताना काँग्रेसने मुख्यमंत्रीपद नाना पटोले यांना दिले नाही तर आम्ही ते हिसकावून घेऊ अशा प्रकारची भूमिका नाना पटोलेंच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून दोन्हीकडे सगळेच आलबेल सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
नाना पटोले यांना कार्यकर्त्यांनी अडचणीत आणू नये :विधानसभा निवडणुकीची घोषणा काही दिवसांत होऊ शकते. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या पूर्वतयारीला लागले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडे जागा वाटपासंदर्भात मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार यावर एकमत नसल्यामुळे ठाकरे गट आणि काँग्रेस मुख्यमंत्री पदावर दावा करीत आहेत. त्यातच विदर्भातील काँग्रेसच्या नेत्यांनी नाना पटोले यांना मुख्यमंत्री देण्याची आग्रही मागणी केली आहे. मुख्यमंत्रीपद नाही दिले तर हिसकावून घेऊ, अशी भाषासुद्धा वापरली आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीसुद्धा एक पाऊल मागे येत आपल्या पक्षाची भूमिका मांडली आहे. काँग्रेस पक्षाचे दिल्लीतील पक्षश्रेष्ठी मल्लिकार्जुन खरगे किंवा राहुल गांधी निर्णय घेतील. काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री पद हिसकावून घेण्याची भाषा होत असेल तर ती नाना पटोलेंच्या प्रतिमेला अडचणीत आणणारी असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच याबाबत महाविकास आघाडीत अद्याप कोणीही चर्चा झालेली नसल्याचंही संजय राऊतांनी सांगितलं आहे.
काँग्रेसने चेहरा दिल्यास आमचं समर्थन : मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवला पाहिजे, यासंदर्भात उद्धव ठाकरेंची भूमिका स्पष्ट आहे. मात्र काँग्रेस पक्ष मुख्यमंत्री पदाचा चेहरा देणार असेल तर आम्ही समर्थन करू अशा प्रकारची भूमिका उद्धव ठाकरे यांची असल्याचं संजय राऊत यांनी अधोरेखित केले. तसेच मुख्यमंत्रीपद दिलं नाही तर आम्ही हिसकावून घेऊ अशा प्रकारची भाषा आम्ही करीत नाही. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अशा प्रकरच्या भाषेमुळे नाना पटोले अडचणीत येऊ शकतात. नाना पटोले यांना अडचणीत आणण्याचं काम त्यांच्या समर्थकांनी करू नये, अशा प्रकारचा इशारावजा सल्लादेखील संजय राऊत यांनी दिला आहे.
भाजपावाले निवडणुकीपूर्वी अजित पवारांचा काटा काढणार : आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाला एकटे पाडण्यासाठीची रणनीती आखली जात असल्याचं बोललं जात आहे, यावर संजय राऊत म्हणाले की, भारतीय जनता पार्टी आणि मिंधे गट एक नंबरचे कटकारस्थान करणारे कपटी लोक आहेत. भारतीय जनता पार्टीवाले फायद्यासाठी आपल्या जवळच्या लोकांचाही काटा काढतात. निवडणुकीपूर्वी अजित पवारांचा काटा काढणार आणि निवडणुकीनंतर मिंधे गटाचा काटा काढणार, अशा प्रकारचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. अजित पवारांना दूर लोटण्याचा कार्यक्रम सुरू असून, त्यात मिंधे गटाचे काही लोक सामील असल्याचंही संजय राऊतांनी सांगितलं आहे. महायुतीत पहिला बळी अजित पवारांचा असेल, तर दुसरा मिंधे गटाचा बळी जाणार असल्याचा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांना दिल्लीला थैल्या द्यावा लागत आहेत :महाविकास आघाडीचे सरकार राज्यात येणार असून, परिवर्तनाला सुरुवात झाली आहे. मात्र महायुतीचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊ देऊ नका अशा प्रकारच्या दिल्लीत हालचाली सुरू असल्याचंही संजय राऊत म्हणालेत. महाराष्ट्रातील निवडणुकीचा सर्व खर्च एकनाथ शिंदे यांनी करावा, झारखंड आणि हरियाणाचा निवडणुकीचा खर्चदेखील मिंधे गटाकडून वसूल करून घेतला जात आहे, त्यांचं मुख्यमंत्रीपद हे पैशांवर टिकले असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला. निवडणूक खर्च केल्यानंतर भविष्यात राज्याच्या नेतृत्वावर ठेवायचे का नाही निर्णय घेऊ. राज्यात भ्रष्टाचार आणि लूटमार सुरू असून, हजारो कोटी रुपये गोळा करून मुख्यमंत्र्यांना दिल्लीला थैल्या द्यावा लागत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. एकेकाळी दिल्लीत काँग्रेसचे राज्य असताना कशा प्रकारे मुंबईतून थैल्या जात होत्या याचं विरोधक वर्णन करीत होते, परंतु आज गुजरातच्या व्यापार मंडळाचे राज्य असून, थैल्या देण्याचं काम महाराष्ट्रातील नेत्यांनाच करावे लागत आहे, त्यावरच त्यांच्या खुर्च्या टिकून असल्याचा टोलादेखील संजय राऊत यांनी लगावला आहे.
वडील मुख्यमंत्री असल्यामुळे आज श्रीकांत शिंदेंची पोपटपंची सुरू: शिंदे गटातील आमदाराबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, ते डबक्यातली बेडूक असून, ते गटारात डरावं डरावं करतात. गद्दारी करून गद्दारांसोबत जाण्यामुळे त्यांचेदेखील डराव डराव सुरूच असणार आहे. गांडूळ आणि बेडूक यांचं आयुष्य पावसापुरतं असतं, पावसाळा संपला की नष्ट होतात. तसेच मिंधे गटाचे होणार असल्याचा टोलाही संजय राऊतांनी लगावला आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असे आव्हान शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेय, त्यावर संजय राऊत म्हणाले की, ते कोण ठरवणार, चोऱ्या-माऱ्या करून लोकसभा निवडणूक जिंकले आहेत. उद्धव ठाकरेंनी त्यांना खासदार केलं हे सगळ्यांना माहीत आहे. भविष्यात ते कदाचित खासदार नसणार आणि वडील मुख्यमंत्री नसणार, वडील मुख्यमंत्री असल्यामुळे आज त्यांची पोपटपंची सुरू असल्याचं म्हणत संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांना टोला लगावला आहे.