मुंबई -राज्याच्या राजकारणात ठाकरे हे नाव नेहमीच राजकीय चर्चेचे केंद्रस्थानी राहिलंय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य आणि अमित ठाकरे यांच्यापर्यंत आजही ठाकरे या नावाचा राजकारणात दबदबा आहे. या चर्चांमध्ये राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? या विषयावर अनेक जण विशेष चर्चा करताना दिसतात. विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात या दोन्ही भावांनी एकमेकांवर राजकीय टीका केली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी हे दोघे भाऊ एकत्र आलेले पाहायला मिळाले. दोनही भावंडांच्या भेटीनंतर आता पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येणार का? या चर्चा सुरू झाल्या असून, याबाबत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय.
उद्धव ठाकरे हेदेखील मला भाऊ आणि मित्राप्रमाणे : याबाबत माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "ही चर्चा अनेक वर्ष सुरू आहे. त्या चर्चेत माझादेखील सहभाग होता. राज ठाकरे यांच्यासोबतदेखील मी काम केलंय. त्यांच्या कुटुंबासोबत मित्रत्वाचं नातं राहिलंय. उद्धव ठाकरे हेदेखील मला भाऊ आणि मित्राप्रमाणे आहेत. काल ते एकत्र आले, याचा नक्कीच आनंद आहे. महाराष्ट्राचं ठाकरे कुटुंबावर जीवापाड प्रेम आहे. दोघांचे पक्ष वेगवेगळे आहेत. राज ठाकरे भाजपासोबत राहून काम करतात. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शाहा हे त्यांचे आयडॉल आहेत. आमच्या पक्षाचं तसं नाही," असंही संजय राऊतांनी सांगितलंय.
फडणवीस, मोदी अन् शाह महाराष्ट्राचे शत्रू : पुढे बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शाह हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. त्यांच्याबरोबर आम्हाला काम करता येणार नाही. महाराष्ट्र लुटण्यामध्ये, मराठी माणसावर अन्याय करणाऱ्यांत आणि शिवसेना फोडण्यामध्ये या तिघांचा फार मोठा सहभाग आहे. अशा व्यक्तीसोबत जाणं महाराष्ट्राशी बेईमानी ठरेल. राज ठाकरे हे अशा लोकांची भलावण करतात. एकेकाळी आम्ही देखील भाजपासोबत राहिलो आहोत. वैचारिक मतभेदाचे दोन वेगळे प्रवाह एकाच कुटुंबात आहेत. अजित पवार, शरद पवार, रोहित पवार हे एकत्र भेटतात ना. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे वेगळ्या पक्षात असले तरीही भाऊ-बहीण म्हणून एकत्र येतात. कोकणातले राणे, त्यांचा एक मुलगा इकडे तर एक मुलगा तिकडे, अशी स्थिती आहे पण कुटुंब एक असतं," असंही ते म्हणालेत.
निर्णय राज आणि उद्धव यांना घ्यावा लागेल : "कुटुंब एकत्र आल्यावर महाराष्ट्राच्या दृष्टीने जे प्रवाह असतात, त्या प्रवाहात आम्हाला वाहत जाता येत नाही. हासुद्धा विचार महाराष्ट्राने केला पाहिजे. काय निर्णय घ्यायचा हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे भाऊ आहेत त्यांनी घ्यायचा आहे. त्यांनी घेतलेला निर्णय महाराष्ट्र मान्य करेल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन पक्षांची युती व्हावी यासाठी कोण प्रयत्न करणार? कालचा लग्न सोहळा हा राजकीय विषय नव्हता. या आधीसुद्धा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत. याकडे राजकीय नजरेने सध्या पाहू नका," अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिलीय.
ते सत्तेसाठी एकत्र आलेत : महायुतीत आता पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असून, याबाबत बोलताना खासदार राऊत म्हणाले की, "आघाडीच्या किंवा युतीच्या सरकारमध्ये शेवटपर्यंत अशा गोष्टी होत असतात. त्याला कोणीही अपवाद नाही. आघाडीचे पक्ष हे जरी कितीही बोलत असले आम्ही एका विचाराने आणि नात्याने एकत्र आलो. पण ते सत्तेसाठी एकत्र आलेत. आपापल्या लोकांना पद मिळावी, मलाईदार खाते मिळावी, आपला आर्थिक गल्ला भरावा म्हणून एकत्र येऊन हे सरकार स्थापन करतात. त्यामुळे शेवटपर्यंत मंत्रिपदासाठी, जागावाटप, खातेवाटप, पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. आता बीडचं पालकमंत्री मुंडे यांना मिळालं तर संतोष देशमुख यांना न्याय मिळणार का? परभणीमधील पालकमंत्री पद 'अ, ब किंवा क' ला मिळालं म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची पोलीस कोठडीत हत्या झाली त्याला खरोखर न्याय मिळू शकतो का?," असा सवाल राऊत यांनी विचारलाय.