मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेनं भटक्या कुत्र्यांची डिजिटल ओळख करण्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमांतर्गत पालिकेनं Pawfriend.in या कंपनीच्या सहकार्यानं भटक्या प्राण्यांसाठी डिजिटल ओळखपत्र तयार करण्याचं काम जुलै 2023 मध्ये सुरू केलं होतं. त्यासाठी या जनावरांचं क्यूआर टॅगिंग केलं जाणार होतं. मुंबईतील भटक्या कुत्र्यांचं ट्रॅकिंग करण्यासाठी पालिकेनं असं पाऊल उचलण्याची ही पहिलीच वेळ होती. या मोहिमेअंतर्गत भटक्या कुत्र्यांच्या गळ्यात क्यूआर कोड असलेले टॅग टांगण्यात आले होते. मात्र, ही योजना आता पालिकेनं गुंडाळली असून, पालिका प्रशासन नव्या पर्यायांचा शोध घेत आहे.
कॉलरमुळं कुत्र्यांना इजा : भटक्या कुत्र्यांचं टॅगिंग करण्यासाठी पालिकेनं ही योजना सुरू केली. या योजनेनुसार भटक्या कुत्र्यांच्या गळ्यात क्यूआर कोड असलेले कॉलर पट्टे देखील बसवण्यात आले. मात्र, कुत्र्यांचं वय वाढल्यानं त्यांचं आकारमान देखील वाढलं. या कुत्र्यांचं आकारमान वाढल्यानं काही कुत्र्यांच्या गळ्यातील हे क्यूआर कोडचे पट्टे तुटले. तर, काही कुत्र्यांना या कॉलरमुळं इजा देखील झाल्याचं समोर आलं. त्यामुळं हा उपक्रम आता थांबवण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतला आहे. त्यामुळं आता पालिका प्रशासन नव्या पर्यायांची चाचपणी करत असून, तंत्रज्ञानाचा वापर करून भटक्या कुत्र्यांची माहिती गोळा करण्यासाठी आणखी कोणते उपक्रम सुरू करता येतील का? यासाठी पालिका प्रशासनानं तयारी सुरू केली आहे.
कुत्र्यांचं केलं लसीकरण : मुंबईत दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून या कुत्र्यांनी पादचाऱ्यांचा चावा घेतल्याच्या घटना वाढत आहेत. यासाठी पालिकेनं कुत्र्यांच्या रेबीज लसीकरणाचा उपक्रम राबवला. या उपक्रमांतर्गत 2014 ते 2023 या कालावधीत एक लाख 72 हजार भटक्या कुत्र्यांचं रेबीज लसीकरण करण्यात आल्याची माहिती, पालिका प्रशासनानं दिली. मात्र, जेव्हा एखादा कुत्रा चावतो तेव्हा त्या कुत्र्याची माहिती उपलब्ध होत नाही. त्या कुत्र्याला कोणता आजार आहे का? हे पहाणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. यासाठी पालिकेनं क्यूआर कोड कॉलरची सुरुवात केली. हा उपक्रम पालिकेनं प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला होता. मात्र एक वर्षात या उपक्रमात पालिकेला अपयश आल्याचं सध्या दिसत आहे.
प्रयोगाला स्वयंसेवी संस्थांनीच दिला पूर्ण विराम : हा उपक्रम जेव्हा सुरू करण्यात आला, त्यावेळी हे QR टॅग आता या भटक्या प्राण्यांसाठी त्यांची डिजिटल ओळख बनतील आणि त्यांचे बेकायदेशीर स्थलांतर रोखण्यात मदत होईल असं पालिकेनं म्हटलं होतं. मात्र, या क्यूआर कोड कॉलरचा भटक्या कुत्र्यांना त्रास होत असल्याचं स्पष्ट झालय. त्यामुळं पालिकेनं स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं सुरू केलेल्या या प्रयोगाला भटक्या कुत्र्यांना त्रास होत असल्यानं, आता स्वयंसेवी संस्थांनीच पूर्ण विराम दिला आहे.
रेबीज प्रतिबंध लसीकरण मोहीम सुरू राहणार : या संदर्भात आम्ही या उपक्रमाशी संबंधित अधिकारी, डॉक्टर कलीमपाशा पठाण यांच्याशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले की, हा उपक्रम थांबवण्यात आला असला तरी, याच स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांची रेबीज प्रतिबंध लसीकरण मोहीम मात्र सुरू आहे. ती यापुढे देखील सुरू ठेवण्यात येणार आहे. यासाठी चार संस्थांची नेमणूक देखील करण्यात आली आहे.
हेही वाचा -