महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधानसभा निवडणूक निकाल उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं राजकीय अस्तित्व संपवणारा ठरेल? - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

विधानसभा निवडणूक निकाल सध्या तरी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहेत. या निवडणुकी दोघांनाही मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागलं.

शरद पवार उद्धव ठाकरे
शरद पवार उद्धव ठाकरे (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 23, 2024, 5:52 PM IST

मुंबई - यावेळी राज्याची निवडणूक ही प्रामुख्यानं अजित पवार शरद पवार तसंच उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या अस्तित्वाच्या लढाईची असल्याचं सांगण्यात येत होतं. या लढाईत मतमोजणी दिवशीच्या संध्याकाळपर्यंतचे कल आणि निकाल पाहता अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी आघाडी घेतल्याचं दिसतय. हे निकाल पूर्णपणे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना धक्का देणारे आहेत. त्यामुळे त्यांच्या राजकीय अस्तित्वावर निश्चितच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. मात्र या निवडणुकीनंतर या दोघांचं राजकीय अस्तित्व संपणार का, हे मात्र लगेच सांगता येईल असं नाही. त्याचवेळी सध्या तरी त्यांना मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागलं आहे असंच म्हणावं लागेल.

पवार ६० वर्षांपासून राजकारणात - महाराष्ट्राच्या राजकारणात पवार घराणं गेल्या साठ वर्षापासून मुख्य प्रवाहात कार्यरत आहे. शरद पवार यांच्या आई वडिलांपासून त्यांच्या घराण्याची राजकीय वाटचाल स्थानिक पातळीपासून सुरु झाली. शरद पवारांनी महाविद्यालयीन काळापासून विद्यार्थी राजकारण करुन त्या काळातील राजकारण्यांच्या वयाचा विचार करता मुख्य प्रवाहात अगदीच कमी वयात यशस्वी पदार्पण केलं. राज्यातील पहिले सर्वात तरुण मंत्री आणि मुख्यमंत्री होण्याचा मान हा शरद पवारांना जातो.

शरद पवार यांच्या राजकारणाला पूर्णविराम? - राज्याच्या राजकारणात मंत्री, कॅबिनेट मंत्री ते मुख्यमंत्री त्यानंतर केंद्रात अनेकदा विविध मंत्रिपदे अशी अनेक पदं शरद पवार यांनी गेल्या साठ वर्षात गाजवली आहेत. शरद पवार यांना एकच मुलगी. तिला राजकारणात उतरवताना शरद पवार यांनी राज्याला प्राधान्य न देता त्यांनी कन्या सुप्रिया सुळे यांना केंद्रिय पातळीवर राजकारणात उतरवलं. त्यांना दिल्लीच्या राजकारणाचं बाळकडू शरद पवार यांनी पाजलं आणि संसदेत अनेक वर्षे काम करताना उत्तम संसदपटूचा बहूमानही सुप्रिया सुळे यांनी अनेकदा मिळवला आहे. एक यशस्वी खासदार म्हणून सुप्रिया सुळे कार्यरत आहेत. त्याचवेळी शरद पवार यांना या निवडणुकीत बसलेला फटका लक्षात घेता, यापुढे त्यांच्या राजकारणाची दिशा काय असेल हे पाहावं लागेल. कारण या निवडणुकीत पवारांनी गेल्यावेळ प्रमाणे त्यांचा बालेकिल्ला असलेला पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढला. मात्र मतदारांनी त्यांना साथ दिली नसल्याचंच दिसतय. त्यामुळे एका अर्थानं शरद पवार यांच्या वैयक्तिक राजकारणाला या निवडणुकीत पूर्णविराम मिळाला आहे, हे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याचवेळी फिनिक्सप्रमाणे भरारी घेणारी शरद पवारांची वृत्ती लक्षात घेता ते या वयातही काय करू शकतील, हे संजय राऊत यांनी सांगितल्या प्रमाणे कुणीच सांगू शकत नाही.

अजित पवारांचा शरद पवारांना धोबीपछाड - दुसरीकडे शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांची राजकीय वाटचाल ही काका शरद पवार यांच्या छायेतच सुरू झाली. अजित पवार यांना सुरुवातीला राष्ट्रीय राजकारणात उतरवण्यात आलं. मात्र त्यांचं मन काही दिल्लीत रमलं नाही. अजित पवार यांनी महाराष्ट्रातील राजकीय कारकीर्द मात्र बहरली. अजित पवार यांचा राज्याच्या राजकारणात मंत्री म्हणून खूपच मोठा दबदबा या कालावधीत निर्माण झाला. प्रशासनावर मोठी पकड आणि जरब असलेला नेता म्हणून अजित पवार यांनी स्वतःचा एक दबदबा निर्माण केल्याचं दिसून येतं. या निवडणुकीत अजित पवार यांचं शरद पवार पानिपत करणार अशी चर्चा होती. लोकसभेतील निकालाच्या पार्श्वभूमिवर असंच चित्र रंगवलं जात होतं. मात्र यावेळी पुतण्यानं काकांना धोबी पछाड दिलेला दिसतोय. शरद पवारांना या निवडणुकीत जेमतेम १०-११ जागा मिळतील असं दिसतंय तर अजित पवार यांनी ४० चा आकडा आघाडीमध्ये दुपारी चार वाजेपर्यंत पार केला होता. त्यामुळे यावेळी त्यांना चौपट जास्त यश मिळत असल्याचं स्पष्ट होत आहे. एका अर्थानं अजित पवार यांनी फिरवून शरद पवारांना धोबीपछाड दिल्याचं निकाल सांगत आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीला उतरती कळा -शरद पवार आणि अजित पवार या दोघांच्या तुलनेत उद्धव ठाकरे यांची राजकीय कारकीर्द तशी तुलनात्मक दृष्ट्या अल्प आहे, असंच म्हणावं लागेल. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाची धुरा महाबळेश्वरमध्ये पक्षाच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर सोपवण्याची योजना केली आणि त्यावेळी तसा निर्णय आणि घोषणाही झाली. त्यावेळी राज ठाकरे समर्थक नाराज झाले होते. त्यानंतर पहिली मोठी उभी कौटुंबीक फूट शिवसेनेमध्ये पडली. राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची यथावकाश निर्मिती केली. त्यानंतर शिवसेनेची धुरा वाहताना उद्धव ठाकरे यांनी राज्यात सुरुवातीला भारतीय जनता पक्षाची साथ दिली. अगदी गेल्या अडीच वर्षापूर्वीपर्यंत उद्धव ठाकरे यांची भाजपाबरोबर युती होती. मात्र मुख्यमंत्री पदावरुन वाद झाल्यानं उद्धव ठाकरे युतीमधून बाहेर पडले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर घरोबा करुन काँग्रेसला सोबत घेऊन राज्यात सरकार स्थापन केलं. यावेळेपासून उद्धव ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागली असंच म्हणावं लागेल.

एकनाथ शिंदे फुटले - उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला जवळ केल्यानं त्यांच्याच पक्षातील म्हणजे शिवसेनेतील बहुतांश आमदार अस्वस्थ झाले होते. ही अस्वस्थता एवढी पराकोटीची होती की शेवटी शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा उभी फूट पडली. राज ठाकरे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा बाळासाहेब ठाकरे हयात होते. यावेळी मात्र ते नव्हते. त्याचाच थेट परिणाम या फुटीमध्ये दिसून आला. राज ठाकरेंच्याबरोबर नगण्य शिवसैनिक त्यावेळी गेले होते. मात्र यावेळी चाळीस पेक्षा जास्त शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाहेर पडले. परिणामी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर जे काही घडले तो इतिहास सर्वांसमोर आहे.

उद्धव ठाकरे यांचं पानिपत - या निवडणुकीत संध्याकाळी ५ वाजेपर्यंतचे कल पाहता. ठाकरेंची शिवसेना २० जागांवर जिंकून येईल असं दिसतय. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना जनतेनं नाकारल्याचंच यातून स्पष्ट होत आहे. त्यातल्या त्यात त्यांच्यासाठी जमेची बाजू म्हणजे मुलगा आदित्य ठाकरे आणि भाचा वरुण सरदेसाई निवडून आला आहेत. मात्र सत्ता जात असल्यानं त्याला काही अर्थ नाही. यापुढे उद्धव ठाकरे उभारी घेऊन राज्याच्या राजकारणात पुन्हा सक्रिय होतील, की त्यांची राजकीय कारकीर्द आदित्य ठाकरे पुढे नेतील हे येणारा काळच ठरवेल.

हेही वाचा...

  1. "लाडक्या बहिणींनी सावत्र भावांना जोडा दाखवला", मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
  2. महाराष्ट्रात वाढलेली मतदानाची टक्केवारी महायुतीला तारक, सत्ताविरोधी लाटेचं समीकरण राज्यात फोल

ABOUT THE AUTHOR

...view details