महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जागतिक स्तरावर भारताचा सन्मान, बैजू पाटील यांच्या छायाचित्राला 'क्रोमेटिक फोटोग्राफी 2024' पुरस्कार जाहीर - PHOTOGRAPHER BAIJU PATIL

जागतिक स्तरावर देशाची मान आणखी उंचावली आहे. कारण छायाचित्रकार बैजू पाटील यांनी काढलेल्या 'जम्बो फ्रेम'ला इंडोनेशियाचा पहिला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Photographer Baiju Patil
छायाचित्रकार बैजू पाटील (Source - Baiju Patil)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 26, 2024, 4:45 PM IST

Updated : Dec 26, 2024, 5:17 PM IST

छत्रपती संभाजीनगर : जगाच्या पातळीवर आपल्या छायाचित्रांची भुरळ घालणाऱ्या बैजू पाटील यांनी काढलेल्या 'जम्बो फ्रेम'ला इंडोनेशियाचा पहिला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 31 देशातील 65 हजार छायाचित्रातून जिम कॉर्बेटमधील हत्तींचा फोटो सर्वोत्तम ठरला आहे. पहिल्यांदाच पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मिळाल्यानं जगाच्या पाठीवर भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या यशाबद्दल छायाचित्रकार बैजू पाटील यांनी आनंद व्यक्त केला आहे.


'या' छायाचित्राला मिळाले पारितोषिक : 'जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान' हत्ती आणि वाघासाठी प्रसिद्ध आहे. इतर प्राणीही येथे मोठ्या प्रमाणात आहेत. वन्यजीव छायाचित्र काढण्यासाठी प्रसिद्ध असलेले बैजू पाटील यांनी कलात्मक असा फोटो घेण्यासाठी जिम कॉर्बेटमध्ये भ्रमंती केली. त्यावेळी त्यांना हत्तींचा कळप दिसला. त्या क्षणी त्यांच्या बाजूने मोठा हत्ती जात होता. त्या हत्तीच्या पायातून समोरील कळपाची फ्रेम त्यांनी टिपली होती. परंतु ही फ्रेम टिपण्यासाठी बैजू यांना प्रचंड मेहनत करावी लागली होती.

प्रतिक्रिया देताना छायाचित्रकार बैजू पाटील (ETV Bharat Reporter)

धोका पत्करून घेतला फोटो : हत्तीची फोटोग्राफी करणे अतिशय अवघड आहे. कारण ते कुठल्याही क्षणी अग्रेसिव्ह होऊ शकतात. कुठल्याही माणसाला ते जवळ येऊ देत नाहीत. पण याचा धोका पत्करुन बैजू यांनी ही जम्बो फ्रेम घेतली होती. या फोटोचं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय छोटी लेन्स आणि अतिशय जवळ जाऊन हा फोटो काढल्यामुळं हे छायाचित्र सगळ्यांच्याच पसंतीस उतरलं आहे. त्याचा आनंद झाल्याचं बैजू पाटील यांनी सांगितलं.



बैजू पाटील ठरले 45 देशात अव्वल :छत्रपती संभाजीनगर येथील छायाचित्रकार बैजू पाटील यांनी 38 वर्षांपासून आपल्या कलेनं आजवर अनेक पुरस्कार प्राप्त केले. पाटील यांना Through The legs इंडोनेशियाचा 'क्रोमेटिक फोटोग्राफी 2024' हा पुरस्कार जाहीर झालाय. 45 देशातील छायाचित्रकारांच्या 65 हजार छायाचित्रांमधून बैजू यांच्या जिमकॉर्बेट राष्ट्रीय उद्यानातील हत्तींचा फोटो अव्वल ठरला आहे.

प्राणी आणि पक्ष्यांचं मुक्तछंद जगणं कॅमेऱ्यात कैद : छायाचित्रकार बैजू पाटील यांना इंडोनेशियातील मानाचा पुरस्कार मिळाल्यामुळं या क्षेत्रातील परदेशी छायाचित्रकारांची मक्तेदारी पुन्हा एकदा मोडीत निघाली आहे. केवळ भारतच नव्हे तर जगातील विविध ठिकाणी जाऊन बैजू यांनी वन्यजीवांची छायाचित्रं काढली आहेत. वन्य प्राणी आणि पक्षी यांचे फोटो काढताना त्यांनी वन्यजीवांमध्ये राहून त्यांचे मुक्तछंद जगणे कॅमेऱ्यात कैद केले आहे.



पाच वर्षांपासून पुरस्कारासाठी प्रयत्न : बैजू पाटील यांना आतापर्यंत 40 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. प्रत्येकवेळी आपल्या कलेतून वेगळेपण दर्शवण्याचा प्रयत्न ते सातत्याने करत असतात आणि त्यातूनच त्यांनी जगाच्या पाठीवर आपला वेगळा ठसा उमटवला आहे. भारतातील वन्यजीव हे अतिशय समृद्ध आहेत आणि अतिशय लाजाळू आहेत. भारतात वन्यजीव छायाचित्रण करणं खूप जास्त आव्हानात्मक आणि अवघड आहे. या कारणामुळंच ते जगभरात प्रसिद्ध झाले आहेत. बैजू पाटील या स्पर्धेसाठी मागील चार ते पाच वर्षापासून विजेते होण्याचा प्रयत्न करत होते. पण यावर्षी त्यांना यश मिळालं आहे. जागतिक स्तरावर पहिलं पारितोषिक मिळवणं खूप अवघड आहे. त्यामुळं बैजू पाटील यांचं सर्वत्र खूप कौतुक होत आहे.

हेही वाचा -

  1. मराठी पाऊल पडते पुढे..! औरंगाबादचे बैजू पाटील निकॉन कंपनीचे ब्रँड अँबेसिडर
  2. World wildlife day : वन्यजीवांशी जवळीक करा - बैजू पाटील
Last Updated : Dec 26, 2024, 5:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details