मुंबईface of chief minister:आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 3 दिवसीय दिल्ली दौरा केला. या दौऱ्यातून उद्धव ठाकरे स्वत:ला मविआचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पुढं आणण्यासाठी प्रयत्न करतायेत अशी चर्चा सुरू झालीय. तर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार? याबद्दल महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांना काय वाटतं? यासंदर्भात आपण जाणून घेऊया.
सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला चेहरा लागतोच : यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, "विधानसभा निवडणुकीला महाविकास आघाडी म्हणून आम्ही सामोरं जात आहोत. एकत्र बसूनच आम्ही हा निर्णय जाहीर करू. त्यामुळं महाविकास आघाडीचा चेहरा कोण? याचं उत्तर तुम्हाला भविष्यात कळेलच. एखाद्या पक्षानं जर निर्णय जाहीर केला तर त्यानं महाविकास आघाडीतील नियमाचं उल्लंघन केल्यासारखं असेल", असं संजय राऊत म्हणाले.
विरोधी पक्षाचा चेहरा आधी ठरवणं योग्य नाही : याविषयी प्रतिक्रिया देत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "जेव्हा विरोधी पक्ष निवडणुकीला सामोरे जात असतो, तेव्हा बहुमत मिळाल्यानंतर आघाडीत सर्वात जास्त आमदार ज्यांचे निवडून येतात तो मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतो. हे फार पूर्वीपासून ठरलेलं सूत्र आहे. त्यामुळं निवडणुकीपूर्वीच एखादा चेहरा देणं योग्य नाही. तसंच आघाडी सरकारच्या स्थिरतेसाठी सर्वात मोठ्या पक्षाचा मुख्यमंत्री होणं स्वाभाविक आहे", असंही ते म्हणाले.
जयंत पाटलांनी उत्तर देणं टाळलं : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यासंदर्भात उत्तरादाखल पत्रकारांनाच उलट प्रश्न विचारला. मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? हा प्रश्न आम्हाला विचारण्यापेक्षा महायुतीला त्यांचा चेहरा कोण? हा प्रश्न विचारा, असं जयंत पाटील म्हणाले.