मुंबई NCP Party Symbol : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या महत्त्वाच्या खटल्याची सर्वोच न्यायालयात सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सदर खटल्याप्रकरणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होते की, पुढील तारीख दिली जाते याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
वकिलांनी दिली माहिती : कायदेतज्ञ शिंदे यांनी सांगिलतं की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह खटल्याची सुनावणी कोर्ट क्रमांक चारमध्ये होणार आहेत. याचवेळी नागालँड राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेची सुनावणी देखील होणार आहे. 19 मार्चला सर्वोच्च न्यायालयानं अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला) निर्देश दिले होते की, तुम्ही शरदचंद्र पवार पक्षाच्या याचिकेवर उत्तर द्या. त्यानंतर ऑगष्टच्या पहिल्या आठवड्यात अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. मात्र, नागालँड प्रकरणी देखील नोटीस पाठवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही आमदारांना अजून पर्यंत नोटीस मिळालेली नाही. त्यामुळे आज हे प्रकरण शेवटच्या क्रमांकावर आहे. सदर प्रकरणी आज युक्तीवाद होणार की नाही, याबाबत चार वाजेपर्यंत संपूर्ण माहिती मिळेल. तर, दुसरीकडे या प्रकरणावर नवीन तारीख मिळण्याची शक्यता आहे. तसंच राज्यातील निवडणूकांपूर्वी याविषयी निर्णय होण्याची शक्यता आहे.