मुंबईVanchit Bahujan Aaghadi :प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने यंदा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत 'एकला चलो'चा नारा दिला आहे. मोदींना सत्तेपासून दूर लोटण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित यावं अशी साद घातली होती. महाविकास आघाडीनंसुद्धा प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले; परंतु जागा वाटपाच्या मुद्द्यावर आंबेडकर आणि महाविकास आघाडी यांच्यात ताळमेळ न झाल्यानं अखेर प्रकाश आंबेडकर यांची 'वंचित' महाविकास आघाडी पासून वंचितच राहिली. आता प्रकाश आंबेडकर हे स्वबळावर निवडणुकीच्या मैदानात उतरले असून त्यांनी आतापर्यंत स्वतःसह २४ लोकसभा मतदारसंघात उमेदवारांची घोषणा केली. ते अजूनही काही ठिकाणी उमेदवार उभे करणार आहेत; परंतु सध्याची राजकीय परिस्थिती पाहता २०१९ पेक्षा २०२४ मध्ये वंचित फॅक्टर मोठ्या प्रमाणामध्ये मताधिक्य घेऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आता वंचितच्या मताधिक्याचा फटका महायुती सोबत महाविकास आघाडीलासुद्धा बसणार आहे.
२०१९ च्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे कामगिरी :२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी २४ मार्च २०१९ रोजी वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाची स्थापना झाली. मागच्या सतराव्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचितने 'एमआयएम'च्या साथीने संपूर्ण राज्यातील लोकसभेच्या ४८ जागा लढवल्या. त्यामध्ये औरंगाबादमधून 'एमआयएम'चे इम्तियाज जलील हे एकमेव खासदार निवडून आले. तर उर्वरित ४७ जागांवर वंचितला पराभव सहन करावा लागला. तरीसुद्धा वंचितने १० ते १२ मतदारसंघांमध्ये ५० हजाराहून अधिक मतं घेतली. अकोला मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. तर सांगलीमध्ये वंचितचे गोपीचंद पडळकर यांनी अडीच लाखांहून अधिक मते घेतली.
वंचितच्या मतांचा उपयोग भाजपाला :त्याच पद्धतीनं बुलडाणा, हिंगोली, गडचिरोली, उस्मानाबाद, नांदेड या मतदारसंघांमध्येसुद्धा वंचितच्या आघाडीची चांगली कामगिरी दिसून आली. इतकच काय अनेक मतदारसंघात वंचितच्या उमेदवाराला मिळालेली ४ ते ५ टक्के मतं इतकी परिणामकारक ठरली की, तिथे अनेक दिग्गजांनासुद्धा पराभूत व्हावं लागलं. २०१९ मध्ये वंचितच्या मतांचा उपयोग हा मोठ्या प्रमाणामध्ये भाजपाला झाला आणि त्यांच्या विरोधातील मतांमध्ये मोठ्या प्रमाणात फूट पडली. या कारणाने भाजपाचे उमेदवार निवडून येण्यास मदत झाली. वंचितला २०१९ च्या निवडणुकीत एकूण ४१,३२,२४२ मतं मिळाली. या मतांची एकूण टक्केवारी ही ७.६४ टक्के इतकी होती.
वंचितच्या मतांचा फायदा नक्की कुणाला :सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा फायदा महाविकास आघाडीला नक्कीच झाला असता; परंतु शेवटच्या क्षणापर्यंत प्रकाश आंबेडकर यांची वाट पाहूनसुद्धा ते महाविकास आघाडीत सामील झाले नाहीत. यावरून दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप झाले. अकोलामधून प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची उमेदवारी घोषित केल्यानंतर काँग्रेसमधून त्यांना पाठिंबा देण्याचा एक सूरसुद्धा उमटला होता; मात्र ते महाविकास आघाडीसोबत आले नाहीत. या ईर्षेने नाना पटोले यांनी अकोला मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. वंचितने आतापर्यंत २४ जागांवर उमेदवार घोषित केले असून सोलापूर आणि नागपूर या दोन ठिकाणी त्यांनी काँग्रेसला सहकार्य करण्याची घोषणा केली आहे. तर सांगलीमध्ये ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांना पाठिंबा घोषित केला असून बारामतीच्या अटीतटीच्या लढतीच्या शर्यतीत सुप्रिया सुळे यांना त्यांनी पाठिंबा घोषित केला आहे. एकंदरीत वंचितने भाजपा विरोधी मोहीम उभारली असून त्यांचा अजेंडा कुठल्याही परिस्थितीत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा आहे. त्यांनी घेतलेली भूमिका व केलेल्या उमेदवारांची घोषणा ही नक्की विरोधकांसाठी फायदेशीर ठरेल की, वंचितच्या उमेदवारांच्या मतांचा फायदा हा मतांमध्ये फूट पडून भाजपाला होईल हे पाहणं गरजेचं आहे.