महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बंडखोरीमुळे बुलढाणा, वाशिम जिल्ह्यात काय आहे परिस्थिती?

काँग्रेसच्या मतदारसंघावर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं दावा करत उमेदवाराला एबी फॉर्म देत अर्ज भरून घेतलाय. त्यामुळे राज्यात बंडखोरांना शांत करण्याचं आव्हान राजकीय पक्षांपुढे आहे.

Washim district due to insurgency
वाशीम जिल्ह्यात बंडखोरी (ETV Bharat FIle Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

मुंबई- राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी उमेदवारी अर्जसुद्धा दाखल केलाय. विशेष म्हणजे काही मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्येच बंडखोरी झालीय. भाजपाच्या मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारानंही उमेदवारी दाखल केलीय. तर काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघावर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं दावा करत उमेदवाराला एबी फॉर्म देत अर्ज भरून घेतलाय. त्यामुळे राज्यात बंडखोरांना शांत करण्याचं मोठं आव्हान राजकीय पक्षांपुढे आहे.

बुलढाणामध्ये मेहकर विधानसभा मतदारसंघात ऐनवेळी पक्षात आलेल्या सिद्धार्थ खरातांना उद्धवसेनेने उमेदवारी दिल्याकारणाने उद्धव सेनेचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछीरे यांनी उमेदवारी अर्ज भरलाय. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण घुमरे हेसुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. चिखली मतदारसंघात भाजपाच्या विद्यमान आमदार श्वेता महाले यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असून, येथून शिंदे सेनेचे मृत्युंजय संजय गायकवाड यांनी बंडखोरी केलीय. बुलढाणा मतदारसंघात शिंदे सेनेचे विद्यमान आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात माजी आमदार भाजपा नेते विजयराव शिंदे यांनी बंडखोरी केलीय. तर मलकापूर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार राजेश एकडे यांच्या विरोधात काँग्रेस नेते एडवोकेट हरीश रावळ यांनी बंडखोरी केलीय. मलकापूर मतदारसंघ भाजपाकडे असताना हरीश रावळ यांनी यापूर्वी दोन वेळा अपक्ष निवडणूक लढवली होती, परंतु ते पराभूत झाले. नंतर २०१९ ला हा मतदारसंघ काँग्रेसकडे आला, परंतु तेव्हाही भाजपामधून काँग्रेसमध्ये आलेले राजेश एकडे यांना उमेदवारी दिल्याने हरीश रावळ यांचा पत्ता कट झाला होता.

वाशिम विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाकडून बहुजन आघाडीमधून पक्षात प्रवेश केलेले डॉ. सिद्धार्थ देवळे यांना उमेदवारी देण्यात आलीय. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. देवळे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीकडून लढवली होती. तर भाजपाने वाशिममध्ये यंदा भाकरी फिरवली असून, सलग तीन वेळा आमदार राहिलेले लखन मलिक यांचा पत्ता कट करून श्याम खोडे यांना उमेदवारी दिलीय. इथे उद्धव सेनेचे निलेश पेंढारकर, राजाभैया पवार यांनी बंडखोरी केलीय. तर भाजपाकडून नागेश घोपे आणि अनिल कांबळे हेसुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. रिसोड मतदारसंघांमध्ये काँग्रेसने विद्यमान आमदार अमित झनक यांना सलग चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. रिसोड मतदारसंघात झनक आणि देशमुख कुटुंबामध्ये पूर्वीपासून पारंपरिक लढत होते. मागच्या वर्षी अनंतराव देशमुख त्यांचे पुत्र एडवोकेट नकुल देशमुख यांच्यासह भाजपावासी झाले. इथे एकनाथ शिंदे गटाकडून भावना गवळी यांना उमेदवारी देण्यात आल्याने अनंतराव देशमुख यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. कारंजा विधानसभा मतदारसंघात भाजपाकडून सई डहाके यांना उमेदवारी देण्यात आलीय. सई डहाके या राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार प्रकाश डहाके यांच्या पत्नी असून, निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलाय. दुसरीकडे भाजपामधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले ज्ञानक पाटणी यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आलीय. ज्ञानक पाटणी हे कारंजाचे दिवंगत माजी आमदार राजेंद्र पाटणी यांचे पुत्र आहेत. तर इथे काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी देवानंद पवार यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय.

हेही वाचा -

  1. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत राजकीय घराण्यांचाच बोलबाला; राजकीय घराणेशाहीतील उमेदवारांची यादी एका क्लिकवर
  2. भाजपाकडून महायुतीमधील राष्ट्रवादीसह शिवसेनेला संपवण्यात आले-रमेश चेन्नीथला

ABOUT THE AUTHOR

...view details