वाशिम :सध्या निवडणुकीचा ज्वर चांगलाच वाढला आहे. पक्षासह प्रशासनही अलर्ट मोडवर आहे. कारंजा येथील शेतकरी निवास इथं इव्हीएम ठेवण्यात आल्या आहेत. या मशीनच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र 25 ऑक्टोबरच्या रात्री जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी भेट दिली असता कर्मचारी झोपलेले आढळून आले. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सहफौजदारांसह चार जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
ईव्हीएमचे सुरक्षा रक्षक झोपले :पारदर्शक वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी निवडणूक विभाग डोळ्यात तेल घालून प्रयत्न करत आहे. यासाठी चोख पोलीस बंदोबस्तात ईव्हीएमची सुरक्षा केली जात आहे. यासाठी पोलीस विभागातील कर्मचारी यांची बंदोबस्तात नियुक्ती केलेली आहे. ईव्हीएम सुरक्षेबाबत सर्वांनाच सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून केलेल्या आहेत. विधानसभा निवडणुकीची पूर्व तयारी करण्यासाठी कारंजा येथील शेतकरी निवास इथं ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या आहेत. इथं पोलिसांचा बंदोबस्त आहे. यासाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी 25 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा शेतकरी निवासाला भेट दिली असता, पोलीस कर्मचारी झोपलेले आढळून आले. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दोन फौजदारांसह एक हवालदार आणि एका पोलीस शिपायावर तत्काळ निलंबनांची कारवाई केली.