ठाणे Loksabha Election 2024 :लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान येत्या २० मे रोजी होणार आहे. ठाणे लोकसभा मतदार संघातील भिवंडी कल्याण आणि ठाणे अशा तीनही मतदार संघातील मतदान केद्रांवर निवडणुकीचं साहित्य पोहोचवण्याच्या तयारीला वेग आला आहे. केद्रावर कर्मचारी साहित्य घेऊन पोहोचले आहेत. यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा प्रशासनानं नियोजन केलं.
१५ हजारांहून अधिक पोलीस बंदोबस्त :भिवंडी, कल्याण आणि ठाणे मतदान केद्रावर हजारो कर्मचारी तैनात करण्यात आलेले असून सुरक्षा व्यवस्था सांभाळण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा दल देखील सज्ज करण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस जिल्ह्यात 15 हजारांहून अधिक पोलीस बंदोबस्त निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी ठाणे शहर पोलीस आयुक्तालय परिसरात एसआरपीसह कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात एसआरपीसह कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, चार अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि सात पोलीस उपायुक्तांसह सुमारे आठ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. अतिरिक्त 3 पोलीस उपायुक्त, नऊ सहायक पोलीस आयुक्त आणि अन्य जिल्ह्यातील 19 निरीक्षकांसह नाशिक प्रशिक्षण केंद्रातील 80 प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक, पिंपरी चिंचवडचे 690 अंमलदार, 3,491 होमगार्ड आणि 7,000 हून अधिक पोलीस कर्मचारी येथे शांतता राखण्यासाठी मदत करतील.