महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीडमध्ये बिहारसारखी परिस्थिती, वाल्मीक कराड सरकारचा जावई आहे का? विजय वडेट्टीवार यांचा सवाल - SANTOSH DESHMUKH MURDER CASE

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्यानं राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही आज या प्रकरणी सरकारवर टीका केली.

Santosh Deshmukh Murder Case
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 29, 2024, 9:26 PM IST

मुंबई : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. या प्रकरणावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताहेत. दरम्यान, या घटनेचा जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही आणि यातील आरोपी सापडत नाहीत, तोपर्यंत मुख्यमंत्री आणि सरकारने धनंजय मुंडे यांच्या मंत्री पदाचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली. आज त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे का?: विजय वडेट्टीवार म्हणाले की, "महाराष्ट्रातील बीडमध्ये बिहारसारखी परिस्थिती आहे. तिथे दरोडा, खून, चोऱ्या, महिला अत्याचार यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. वाल्मीक कराड हा फरार आहे. याला अजून सरकारने अटक का केली नाही? सरकारचा तो कोण लागतोय? सरकारचा वाल्मीक कराड जावई आहे का?," असा सवाल यावेळी विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. अधिवेशनात सरकारने मोठी घोषणा केली होती. जे आरोपी असतील त्यांच्यावर मोक्का लावू..., आरोपींना अटक करू..., कोणालाही सोडणार नाही..., असं आश्वासन अधिवेशनात सरकारने दिलं होतं. मात्र अद्यापपर्यंत आरोपी मोकाट आहेत. या घटनेची संपूर्ण चौकशी निष्पक्षपणे झाली पाहिजे. तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.

मग पोलिसांच्या हाताला लकवा मारलाय का? : "परभणीतील आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांच्या हाणामारीत आंदोलकाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. त्यावेळी पोलिसांच्या हाताला धार आली होती. मात्र आता बीडमधील आरोपी मोकाट असताना पोलीस कुठे आहेत? आता पोलिसांच्या हाताला धार का येत नाही, आता पोलिसांच्या हाताला लकवा मारलाय का?," असा संतप्त सवाल यावेळी विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

सरकार कुणाला घाबरत आहे - ठाकरे :बीड आणि परभणी घटनेवरून शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर चांगलाच हल्लाबोल चढवला आहे. "बीड आणि परभणीतील घटनेवरून सुरेश धस आणि जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात भाषण केल्यानंतर त्याला मुख्यमंत्र्यांनी जे उत्तर दिलं, ते ऐकून मुख्यमंत्री यांच्यावर काहीतरी कारवाई करतील, असं मला वाटलं होतं. पण अद्यापपर्यंत मुख्यमंत्र्यांनी काही कारवाई केली नाही. सरकार नेमकं कुणाला घाबरते? नक्की लपवाछपवी कुणासाठीचा चालू आहे. सरकारकडून काहीच का होत नाही? की सरकार सुट्टीवर गेले हे आम्हाला कळायला पाहिजे," अशी टीका आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि राज्य सरकारवर केली.

हेही वाचा :

  1. "वाल्मिक कराड निकटवर्तीय असल्यानं मुंडेंनी राजीनामा द्यावा", आमदार संदीप क्षीरसागर यांनी स्पष्टचं सांगितलं
  2. बीड सरपंच हत्या प्रकरणात राजकीय वातावरण तापलं, सुरेश धस आणि वाघमारे यांनी केली टीका
  3. बीड जिल्ह्यात 1281 पिस्तूल परवानाधारक; विनापरवाना पिस्तूल वापरणाऱ्या नागरिकांची संख्या किती?

ABOUT THE AUTHOR

...view details