अमरावती : दिव्यांगांच्या सर्वांगिण विकासाठी मंत्रालयाचं काम अद्यापही सुरू झालेलं नाही. पदावर राहून हे काम होणार, अशी शक्यता मला वाटत नाही. दिव्यांगांसोबत बेईमानी करणं मला शक्य नाही, असं स्पष्ट करत प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि अचलपूरचे माजी आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. शुक्रवारी राजीनाम्याची प्रत बच्चू कडू यांनी मुंबईत सह्याद्री अतिथी गृह इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केली.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे मानले आभार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं राजीनाम्याचं पत्र पाठवताना देशातले पहिले दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रात निर्माण केल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बच्चू कडू यांनी आभार मानले आहेत. आभार व्यक्त करतानाच "अद्यापपर्यंत दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्रालयाचं काम सुरू झालेलं नाही. या विभागाच्या दिव्यांगांसोबत बेईमानी मला शक्य नाही. त्यामुळे माझा दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान, अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. तो मंजूर करुन सहकार्य करावं तसेच मला असलेली सुरक्षा सुद्धा काढून टाकावी. कुठलीही सुरक्षा मला ठेवण्यात येऊ नये," असंही पत्रात नमूद केलं
बच्चू कडू यांनी व्यक्त केली खंत : "राज्यात दिव्यांग मंत्रालय निर्माण झालं, पण इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात दिव्यांगांना मिळणारं मानधन सर्वात कमी आहे, हे मानधन वेळेवर कधीच मिळत नाही. स्थानिक स्वराज्य संस्था दिव्यांगांसाठी तरतूद असलेला 5 टक्के निधी खर्च करत नाही. अजूनही या विभागासाठी स्वतंत्र मंत्री नाही, सचिव नाही. जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र कार्यालय नाही, पदभरती नाही. इतर अनेक बाबींची पूर्तता झालेली नाही. दिव्यांगांच्या सर्वांगिण विकासासाठी मला आंदोलन करावं लागणार. या पदावर राहून दिव्यांगासोबत बेईमानी कदापी शक्य नाही," अशी खंत देखील बच्चू कडू यांनी व्यक्त केली.
आमदार प्रवीण तायडे यांनी केली होती मागणी : 24 मे 2023 रोजी बच्चू कडू यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. आता विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू पराभूत झाल्यावर अचलपूर मतदार संघाचे नवे आमदार प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांना दिव्यांग कल्याण मंडळाच्या अध्यक्ष पदावरून कडून टाकावं, अशी मागणी शासनाकडं केली होती. विशेष म्हणजे गत काही दिवसांपासून आमदार प्रवीण तायडे आणि बच्चू कडू समर्थकांमध्ये शाब्दिक वाद पेटला आहे. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण मंडळाच्या अध्यक्षपदाचा 3 जानेवारीला राजीनामा देत 7 जानेवारीला मेंढपाळ आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार विरोधात आंदोलनाची घोषणा केली.
हेही वाचा :