महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विजय वडेट्टीवारांनी एकनाथ शिंदे यांच्याकडं आणला होता स्वतःचा प्रस्ताव; सामंत यांचा गौप्यस्फोट, छावा चित्रपटाबाबतही मोठा खुलासा - UDAY SAMANT ON VIJAY WADETTIWAR

मंत्री उदय सामंत यांनी वडेट्टीवार यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अनुशंगाने झालेल्या पत्रकार परिषदेत सामंत बोलत होते.

UDAY SAMANT ON VIJAY WADETTIWAR
माध्यमांशी बोलताना मंत्री उदय सामंत (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 25, 2025, 7:48 PM IST

पुणे :राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार असल्याचं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मांडलं होतं. तसंच भाजपासोबत 20 आमदारांना घेऊन उदय सामंत नवीन उदय करणार असल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. याबाबत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांना विचारलं असता ते म्हणाले की, संजय राऊत यांच्याबाबत मला माहीत नाही. ते आमच्यासोबत महाविकास आघाडीमध्ये होते. त्यांची उपमुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? हे मला माहीत नाही. वडेट्टीवार यांनी याची सुरवात केली आहे. मला माहीत आहे की, त्यांनी स्वतःचा प्रस्ताव हा एकनाथ शिंदे यांच्याकडे आणला होता.

वडेट्टीवार यांना कदाचित वाटत असेल की, मी आडकाठी आणत आहे. त्यामुळं कोणाची बदनामी करायची तर माझी केली. त्यांना कोणाच्या मार्फत फोन गेला होता ते कोणाशी बोलले याबद्दल माझ्याकडे इत्यंभूत माहिती आहे. ती कोणाकडेच नाही. माझ्या नावावर शंका उपस्थित करून ज्यांचा स्वतःचा अस्त झाला आहे. त्यांनी स्वतःचा उदय करू नये असं यावेळी सामंत म्हणाले. विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अनुशंगानं आज मंत्री उदय सामंत यांनी बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली.

यावेळी मंत्री उदय सामंत म्हणाले की, पुण्यात 'विश्व मराठी साहित्य संमेलन' 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान फर्ग्युसन कॉलेजमध्ये होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विश्व मराठी संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांचा विश्व साहित्य संमेलनात 'साहित्य भूषण पुरस्कार' देऊन गौरव करण्यात येणार आहे. तसंच दिल्लीत होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शासन म्हणून सर्वतोपरी मदत करणार आहे. त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांना काय पाहिजे त्याची पूर्तता देखील करणार आहे.

संमेलनाला अमेरिकेतून येणाऱ्या व्यक्तीला ७५ हजार रुपये देतोय. युरोप मधून येणाऱ्यांना ५० हजार, दुबईमधून येणाऱ्यांना २५ हजार देतोय. या खर्चावर टीका करण्यापेक्षा उद्देश समजून घ्यावा. मराठी जगभरात पोहोचवण्यासाठी हा प्रयत्न आहे, असं उदय सामंत म्हणाले. दावोस दौऱ्याबाबत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेच्या बाबत सामंत यांना विचारलं असता ते म्हणाले की, अनंत अंबानी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. अंबानी समूह 3 लाख 5 हजार कोटींची गुंतवणूक दावोसच्या माध्यमातून महाराष्ट्रात करणार आहेत. ज्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी यावर बोलावे. तसंच राज्याचं नाव मोठं होत असल्यानं काही लोकांना पचत नाही. त्यांच्याकडून फेक नरेटीव्ह सेट केलं जात आहेत. त्यांना दावोसला जायला मिळाले नाही, म्हणून पोट दुखत आहे.

मला त्यांच्या पत्रकार परिषदेवर बोलून त्यांना मोठं करायचं नाही. ज्यांच्यासोबत करार झाले, त्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. दावोस हा जागतिक स्तरावरील प्लॅटफॉर्म आहे. त्या दौऱ्यावर झालेला संपूर्ण खर्च आम्ही घोषित करणार आहोत. 4 वर्षांपूर्वी जे गेले होते त्यांचं पुढं काय झालं असं यावेळी सामंत म्हणाले. छावा चित्रपटाबाबत केलेल्या ट्विटबाबत सामंत म्हणाले की, हिंदी चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जगासमोर जातोय ही आनंदाची बाब आहे. त्या चित्रपटाविषयी काही आक्षेप असेल तर तो चित्रपट विद्वानांना दाखवावा. त्यात खरोखरच काही आक्षेपार्ह असेल तर योग्य निर्णय घ्यावा. चित्रपट प्रदर्शित करू नये असं मी म्हणालो नाही, असं यावेळी सामंत यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा :

  1. काँग्रेस उद्धव ठाकरेंना जाणिवपूर्वक बाजूला करतंय का? उदय सामंतांचा सवाल; का म्हणाले असं?
  2. राज्यात तिसऱ्या शिवसेनेचा 'उदय' होणार? विजय वडेट्टीवार, संजय राऊतांच्या दाव्यानं राज्यात खळबळ
  3. भाजपात येण्यासाठी वडेट्टीवार कितीदा फडणवीसांना भेटले, मला माहितीय; उदय सामंत यांचा पलटवार

ABOUT THE AUTHOR

...view details