महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन बिहारला खैरात तर महाराष्ट्राला..."; विजय वडेट्टीवारांची टीका - UNION BUDGET 2025

केंद्रीय अर्थसंकल्पात बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन त्यांना अधिक निधी दिल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

UNION BUDGET 2025
विजय वडेट्टीवार (संग्रहित छायाचित्र)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 1, 2025, 10:30 PM IST

Updated : Feb 1, 2025, 10:50 PM IST

चंद्रपूर :आज सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन या राज्याला भक्कम निधीची खैरात वाटण्यात आली तर महाराष्ट्राच्या वाट्याला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. चंद्रपूरात त्यांनी हे वक्तव्य केलं.

महाराष्ट्रातून केंद्राला सर्वाधिक कर :आजच्या अर्थसंकल्पात बिहार राज्यासाठी विविध घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. तिथून सरकारला टेकू मिळत असल्यानं आणि येणाऱ्या काळात निवडणूक असल्यानं जाणीवपूर्वक बिहारला झुकतं माप देण्यात आलं. पण महाराष्ट्राला मात्र, सापत्न वागणूक देण्यात आली. महाराष्ट्र हे राज्य केंद्र सरकारला सगळ्यात जास्त कर देतं मात्र, याची योग्य परतफेड त्यात आर्थिक भर घालून करण्यात आली नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.

माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार (ETV Bharat Reporter)


रोजगार निर्मितीसाठी अर्थसंकल्पात काही नाही :आज जनसामान्य वर्ग, शेतकरी हलाकीचं जीवन जगत आहेत. त्यातही महागाई त्यांचे कंबरडं तोडत आहे. मात्र या वर्गासाठी या अर्थसंकल्पात काहीही नाही. सुशिक्षित बेरोजगारी चिंताजनकरित्या वाढत चालली आहे. यामुळं युवक नैराश्यानं ग्रस्त झालं आहे. मात्र, रोजगार निर्मितीसाठी या अर्थसंकल्पात काहीही नाही. महाराष्ट्र राज्याला मुंबई, पुणे येथील मेट्रो आणि मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी केवळ निधी देण्यात आलाय. मात्र, ग्रामीण महाराष्ट्राचं काय? ग्रामीण भागातील महत्त्वाच्या प्रकल्पासाठी आणि विकासासाठी काहीच या अर्थसंकल्पात नाही. इन्कम टॅक्समध्ये केवळ सूट दिली आहे. मात्र, आज सामान्य वर्गावर जीएसटी आणि इतर अनेक करांचा बोजा आपण लादला, त्यात दरवेळेस वाढ करण्यात येतं आहे. सोबत वाढती महागाई सर्वसामान्यांच कंबरडं मोडत आहे. अशावेळी कर तरतूदीने असा कुठला मोठा दिलासा या वर्गाला आपण दिला आहे?


उत्पादनाच्या तुलनेत योग्य हमीभाव मिळत नाही :आज शेतकरी वर्ग त्रस्त आहे. खत, बी-बियाण्याची किंमत प्रचंड महागली आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत त्याला योग्य हमीभाव मिळत नाही. शेतकऱ्यांना हवी हमीभावाची तरतूद देखील या अर्थसंकल्पात केलेली नाही. आज महाराष्ट्रातील कंपन्या महाराष्ट्र सरकारशी डाओस येथे जाऊन करार करतात आणि सरकार मोठी गुंतवणूक झाल्याचा नाटक करते. वास्तविक विदेशी गुंतवणूक त्यात केली जात नाही. नव्या योजनांना निधी देण्याचे या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आले. मात्र याच योजनांना आधीचा निधी अद्याप या सरकारने दिलेला नाही. त्यामुळे या योजना आज थंडाबसत्यात गेल्या आहेत. त्यामुळे निव्वळ नाटक तयार करणारा हा अर्थसंकल्प आहे अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
नुसती घोषणा झाली पण, त्यातून हाती काही लागले नाही. त्यामुळे, नॅशनल मॅन्यूफॅक्चरींग हे नवीन मिशन आणले आहे, म्हणजे नवीन बाटलीत जुनेच औषध पुन्हा देण्यात येत आहे, अशी टीका ही वडेट्टीवार यांनी केली.


हेही वाचा :

  1. स्पेशल रिपोर्ट : तूर डाळ उत्पादनात महाराष्ट्र देशात 'टॉप'; उत्पादन ते विक्री, जाणून घ्या A टू Z माहिती
  2. केंद्रीय अर्थसंकल्पातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा भ्रमनिरास
  3. केंद्राच्या 'मिशन डाळ'चा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना फायदा होणार नाही; शेतकरी नेत्यांचा सूर
Last Updated : Feb 1, 2025, 10:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details