ठाणेStudent suicide in Thane : एका प्रसिद्ध इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आठवीत शिक्षण घेणाऱ्या १३ वर्षीय विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आत्महत्या करण्यापूर्वी मृत विद्यार्थ्यानं सुसाईड नोट तयार करून ठेवल्यानं घटना उघडकीस आली. शिक्षिकेसह एका विद्यार्थ्यांनं चिडवल्यामुळे आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालय. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे; मात्र या घटनेमुळं कल्याण पूर्वेत एकच खळबळ उडाली आहे.
विद्यार्थ्यानं केलेल्या आत्महत्येच्या घटनेबाबत सांगताना पोलीस अधिकारी (ETV Bharat Reporter) घरी कोणीही नव्हतं, त्यानं केली आत्महत्या :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थी हा आपले वडील, आई आणि बहिणीसोबत कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा परिसरात राहात होता. तो कल्याण पूर्व परिसरातील एका नामांकित इंग्रजी माध्यमिक शाळेत आठवी इयत्तेत शिक्षण घेत होता. ११ ऑगस्ट रोजी रविवारी त्याचे वडील नेहमीप्रमाणे नवी मुंबई येथील एका खासगी कंपनीत कामावर गेले होते. तर बहिणीच्या शाळेत मिटिंग असल्याने आई आणि बहीण शाळेत मिटिंगमध्ये उपस्थित राहण्यासाठी गेले होते. त्यावेळी मृतक घरात एकटाच होता. त्यानं सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास आत्महत्या केली.
वडिलांनी पाहिला मुलाचा मृतदेह :मृताचे वडील कामावरून घरी आल्यानंतर घराचा दरवाजा ठोकला; पण आतून दार बंद असल्यानं प्रतिसाद मिळत नव्हता. हे पाहून त्यांनी खिडकी उघडून आत पाहिले असता, हॉलमध्ये मुलाचा मृतदेह दिसला. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर शेजारील रहिवाशांनी धाव घेऊन या घटनेची माहिती कोळसेवाडी पोलिसांना दिली. माहिती मिळताच कोळसेवाडी पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी महापलिकेच्या बाई रुख्मिणी रुग्णालयात रवाना केला.
वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल :कोळसेवाडी पोलिसांनी सुरुवातीला मृतकचे वडील यांच्या फिर्यादीवरून एडीआर दाखल केला; मात्र त्यानंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "विद्यार्थ्याजवळ एक सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये एका मुलासह शिक्षिकेचा उल्लेख आहे. या दोघांनी चिडवल्यामुळे त्यानं आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे." या घटनेची कोळशेवाडी पोलिसांनी नोंद करत पुढील तपास सुरू केलाय. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, "१३ वर्षीय मुलानं राहत्या घरात आत्महत्या केली असून त्याच्या मृतदेहाजवळ एक सुसाईट नोट आढळून आली आहे. त्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. डी. डोके यांनी या घटनेचा तपास सुरू केल्याचं सांगितलं."
आत्महत्या हा उपाय नाही : जर तुमच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील अथवा एखाद्या मित्राबद्दल काळजी वाटत असेल किंवा तुम्हाला भावनिक आधाराची गरज असेल, तर कोणीतरी नेहमी ऐकण्यासाठी उपलब्ध असते. तुम्ही स्नेहा फाउंडेशन - ०४४२४६४००५० (२४x७ उपलब्ध) किंवा iCall, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेची हेल्पलाइन - ९१५२९८७८२१ वर कॉल करा. ही हेल्पलाईन सोमवार ते शनिवार सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत उपलब्ध आहे.
हेही वाचा:
- 'VNIT'च्या विद्यार्थ्याची आत्महत्या, दरवाजा तोडून काढला मृतदेह बाहेर - VNIT student suicide
- रॅगिंगचा धक्कादायक प्रकार: नग्न करत मारहाण करून व्हिडिओ शूट केल्यानं विद्यार्थ्याची आत्महत्या, सहा जणांवर गुन्हा
- Kota Student Suicide : विद्यार्थिनीला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी कोटाच्या कोचिंग सेंटरवर गुन्हा दाखल