मुंबई: ज्येष्ठ पत्रकार, कवी आणि चित्रपट निर्माते प्रीतिश नंदी यांचं बुधवारी मुंबईत निधन झालं, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. 73 वर्षीय नंदी यांचं दक्षिण मुंबईतील त्यांच्या घरी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. X वरील एका पोस्टमध्ये, ज्येष्ठ अभिनेते आणि नंदींचे मित्र अनुपम खेर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
अनुपम खेर ट्विट :अनुपम खेर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, प्रस्तुतकर्ता, कवी आणि लेखक प्रीतिश नंदी हे त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी ओळखले जात होते. भारतीय चित्रपटसृष्टीतील ते एक प्रमुख नाव होते आणि त्यांच्या ‘चमेली’ आणि ‘प्यार के साइड इफेक्ट्स’ सारख्या प्रसिद्ध चित्रपटांनी प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं. त्यांनी बनलेल्या चित्रपटांचं नेहमीच विशेष कौतुक होतं. त्यांनी लिहिलेले शब्द आणि त्यांचा दृष्टीकोन नेहमीच नवनवीन आयाम मांडत असे. असं अनुपम खेर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
प्रीतिश नंदी कम्युनिकेशन्स या त्यांच्या कंपनीने 'सूर', 'कांटे', 'झंकार बीट्स', 'चमेली', 'हजारों ख्वाइशें ऐसी' आणि 'प्यार के साइड इफेक्ट्स' सारखे चित्रपट बनवले आणि 'फोर मोअर शॉट्स' या वेब सीरिजचीही निर्मिती केली. नंदी यांनी इंग्रजीमध्ये कवितांची सुमारे 40 पुस्तके लिहिली आणि बंगाली, उर्दू आणि पंजाबीमधून इंग्रजीमध्ये कविता अनुवादित केल्या.