नांदेड : एका सात वर्षाच्या चिमुकलीला गावातील एका महिलेनं दोन दिवस डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. दोन दिवसांनी या चिमुकलीचा तपास लागला असून या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. तर अघोरी विद्या किंवा नरबळीच्या उद्देशानं महिलेनं हा प्रकार केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्या अनुषंगानं पोलीस पुढील तपास करत आहेत. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
नेमकं काय घडलं? : 20 जानेवारी रोजी सात वर्षीय प्रांजल कदम दुपारी 4 वाजता शाळेतून घरी आली. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजेच्या आसपास ती घराच्या बाहेर खेळायला गेली. मात्र, बराच वेळ होऊनही चिमुकली घरी परतलीच नाही. त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी गावात तसंच नातेवाईकांकडं तिचा शोध घेतला. मात्र, ती सापडलीच नाही. अखेर माळाकोळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. मुलीच्या शोधासाठी पोलिसांनी 10 जणांची टीम पाठवली. जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, डीवायएसपी अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली माळाकोळी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं या प्रकरणाचा सखोल तपास केला. त्यानंतर दोन दिवसांनी मुलगी गावातील एका महिलेच्या घरात कैदेत आढळली. पोलिसांनी मुलीची सुटका करत तीन जणांना अटक केली आहे.
पुढील तपास सुरू : यासंदर्भात अधिक माहिती देत डीवायएसपी अश्विनी जगताप म्हणाल्या, "लोहा येथे माळाकोळी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. सदर आरोपी महिला ही तंत्र-मंत्र आणि अंधश्रद्धेवर विश्वास ठेवते. त्यामुळं नरबळीच्या उद्देशानं मुलीचं अपहरण केल्याची शक्यता आहे."
हेही वाचा -