महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वेणूताईंची जन्मशताब्दी : साताऱ्यात महिलांसाठी वर्षभर भरगच्च कार्यक्रम, शरद पवारांच्या हस्ते होणार समारोप - VENUTAI CHAVAN BIRTH CENTENARY

दिवंगत वेणूताई चव्हाण यांचं यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त कराडमध्ये वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

Venutai Chavan birth centenary
वेणूताई चव्हाण जन्मशताब्दीबद्दल पत्रकार परिषदेत माहिती देताना माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 22, 2025, 3:56 PM IST

सातारा -संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पत्नी दिवंगत वेणूताई चव्हाण यांचं जन्मशताब्दी वर्ष विविध कार्यक्रमांनी साजरे करण्यात येणार असल्याची माहिती माजी सहकार मंत्री तथा सौ. वेणूताई चव्हाण ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.



शिक्षण संस्था, ट्रस्टच्या माध्यमातून कार्यक्रम : कराड येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, वेणूताई चव्हाण कॉलेज, सौ. वेणूताई चव्हाण स्मारक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत सौ. वेणूताई यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दि. २ फेब्रुवारी २०२५ ते १ फेब्रुवारी, २०२६ या दम्यान हे कार्यक्रम होणार असल्याचं माजी आमदार बाळासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितलं.

कर्तृत्ववान महिलांचा होणार सन्मान :वेणूताईंच्या जन्मशताब्दी निमित्तानं १० मार्च रोजी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा, एप्रिलमध्ये महिला आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे. तसेच १ मे रोजी देवराष्ट्रे, विरंगुळा, वेणूताई चव्हाण स्मारक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, यशवंतराव चव्हाण स्मृती सदन, प्रीतीसंगम समाधी स्थळ, वेणूताई चव्हाण कॉलेज या ठिकाणी महिला भेटी आयोजित करण्यात आल्या आहेत.

बचत गटांच्या उत्पादनांचं प्रदर्शन :फलटणहून १ जून रोजी कराडला ज्योत आणण्यात येणार आहे. जुलैमध्ये महिला बचतगटांची एकदिवसीय कार्यशाळा आणि महिला बचतगट उत्पादन साहित्य प्रदर्शन, वृक्षारोपण, ऑगस्टमध्ये चित्रकला स्पर्धा, सप्टेंबर महिन्यात जप साधना आणि राज्यस्तरीय सुगम गायन स्पर्धा होणार आहे. ऑक्टोबरमध्ये मध्यवर्ती युवा महोत्सव, रक्तदान शिबिर तर २५ नोव्हेंबर रोजी मॅरेथॉन स्पर्धा, आंतरविभागीय महिला क्रीडा स्पर्धा होणार असल्याचं माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं.

जात्यावरच्या ओवी आणि ग्रंथाचं होणार प्रकाशन :जन्मशताब्दी सोहळ्याच्या अखेरच्या टप्प्यात डिसेंबरमध्ये 'ही ज्योत अनंताची' या ग्रंथाचं तसंच जात्यावरच्या ओवी संग्रहाचं प्रकाशन होणार आहे. जानेवारी २०२६ मध्ये लोककला जागर, सौ. वेणूताई चव्हाण जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा होईल. १ फेब्रुवारी २०१६ ला जन्मशताब्दी सोहळ्याची सांगता, अशा भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.

शरद पवारांच्या हस्ते होणार अर्ध पुतळ्याचं अनावरण :दिवंगत वेणूताई चव्हाण यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याची सांगता खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी वेणूताईंच्या जीवनावरील विशेष स्मरणिकेचं प्रकाशन तसेच वेणूताई चव्हाण कॉलेजमध्ये वेणूताईच्या अर्ध पुतळ्याचं अनावरण शरद पवारांच्या हस्ते होणार आहे. जन्मशताब्दी निमित्त वेणूताई चव्हाण कॉलेजमधील प्राध्यापकांची कराडमधील शाळा, महाविद्यालयांमध्ये वर्षभर व्याख्याने होणार आहेत.

वेणूताईंचा संघर्षमय जीवनपट :दिवंगत वेणूताई चव्हाण यांचा जन्म २ फेब्रुवारी १९२६ रोजी फलटणमध्ये झाला. वडील रघुनाथराव मोरे आणि आई लक्ष्मीबाईंनी त्यांच्यावर देशभक्तीचे संस्कार केले. २ जून १९४२ रोजी कराड येथे यशवंतराव चव्हाणांबरोबर त्या विवाहबद्ध झाल्या. १९४२ ते १९४७ या काळात महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली यशवंतरावांनी भारत छोडो आंदोलनात उडी घेतली. त्यांना अनेक दिवस तुरुंगात रहावे लागले. आयुष्यात आलेल्या खडतर परिस्थितीला तोंड देत वेणूताईनी यशवंतराव चव्हाण साहेबांचा संसार समर्थपणे सांभाळला. यशवंतराव हे राजकीय जीवनात व्यस्त झाल्यानंतर वेणूताईंनी कुटुबांची जबाबदारी पेलली. १ जून १९८३ रोजी त्या अनंतात विलीन झाल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details