अमरावती : १४ फेब्रुवारी म्हणजे 'व्हॅलेंटाईन्स डे' हा प्रेमाचा दिवस म्हणून दरवर्षी जगभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु, तुम्हाला हे ठाऊक आहे का की, अनेक वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांवर निरातिशय प्रेम करणाऱ्या सात वीरांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन स्वराज्याबद्दलची निष्ठा दाखवून दिली होती.
"म्यानातून उसळे तरवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात" शेकडोच्या संख्येत असणाऱ्या सैन्यावर आपल्या राजाच्या प्रेमापोटी तुटून पडणाऱ्या या सात वीरांची शौर्यगाथा कुसुमाग्रज यांनी आपल्या शब्दांत गुंफली. पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं आणि लता मंगेशकर यांच्या दैवी स्वरांनी अजरामर झालेलं हे गीत ऐकून अंगावर रोमांच आले नाहीत, असा शिवप्रेमी सापडणे नाही! ३५१ वर्षांपूर्वी शिवरायांच्या सात वीरांच्या शौर्यगाथेला इतिहास विषयाचे अभ्यासक प्रा. डॉ. वैभव मस्के यांनी खास 'ईटीव्ही भारत'शी बोलताना उजाळा दिला.
बहलोल खानाचा रयतेवर अन्याय : आदिलशहाचा सेनापती बहलोल खान हा सातत्यानं मराठ्यांना त्रास देत होता. मराठ्यांवर त्याचे वारंवार हल्ले व्हायचे. हा सेनापती मराठ्यांकडून खंडणीदेखील वसूल करायचा. बहलोल खानाकडून रयतेवर प्रचंड अन्याय केला जात होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी बहलोलचा बंदोबस्त करावा, या संदर्भात स्वराज्याचे तिसरे सरसेनापती प्रतापराव गुजर यांना तातडीनं पत्र पाठवलं. १५ एप्रिल १६७३ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचं पत्र प्रतापराव गुजर यांना प्राप्त झालं. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदेश प्राप्त होताच प्रतापराव गुजर यांनी 'उमराणी' नावाच्या ठिकाणी बहलोल खानाच्या सैन्याला वेढा घातला. यामुळं बरेच दिवस त्याच्या सैन्याला खायला-प्यायला काहीच मिळालं नाही. सैन्याची दुर्गती पाहून बहलोल खानानं आपल्याला सोडून देण्यात यावं, अशा विनवणी प्रतापराव गुजर यांच्याकडे केली. पहाडासारख्या पठाणाचा प्रतापराव गुजर यांच्यासमोर अक्षरशः 'ससा' झाला होता. प्रतापराव गुजर यांना त्याच्यावर दया आली. त्यांनी त्याच्याकडून खंडणी वसूल करत त्याला त्याच्या सैन्यासह सोडून दिलं.
महाराजांनी प्रतापरावांना सुनावले खडे बोल : "बहलोल खान याच्यासोबत तह करून त्याला सोडण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? राजा तुम्ही आहात की आम्ही? " असा सवाल करत छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापराव गुजर यांना बहलोल खानाला ठार मारल्याशिवाय तोंड दाखवायचं नाही, असे खडे बोल पत्राद्वारे सुनावले. आपले राजे आपल्यावर नाराज झालेत, याचं प्रचंड दुःख प्रतापराव गुजर यांना झालं.
व्यथित प्रतापरावांना दहा महिन्यांनंतर मिळाली संधी : आपल्यामुळे राजे दुखावले असल्यानं अन्न ,पाणीदेखील प्रतापराव गुजर यांच्या घशाखाली उतरत नव्हतं. आपलं तोंड देखील दाखवायचं नाही, हा राजांचा आदेश प्रतापराव गुजर यांना सतत सतावत होता. अशा परिस्थितीत तब्बल दहा महिन्यानंतर बहलोल खान हा कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात येणाऱ्या नेसरी या गावाच्या परिसरात आल्याची माहिती प्रतापराव गुजर यांना मिळाली. आपल्या दोन हजार सैन्यासह १४ फेब्रुवारी १६७४ रोजी प्रतापराव गुजर हे नेसरी गावातील टेकडीवर पोहोचले.