छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Afsar Khan Candidacy: एमआयएम पक्षाला पाठिंबा देण्यासाठी वंचिततर्फे अधिकृत उमेदवाराला एबी फॉर्म देण्यात आला नसल्याने, राजकीय चर्चांना उधाण आले होते; मात्र त्यावर आता पूर्णविराम लागला आहे. यावर बोलताना वंचितने कोणालाही पाठिंबा मागितला नव्हता; मात्र मतांच्या गरजेपोटी त्यांनी स्वतःहून तो पाठिंबा जाहीर केला, अशी टीका अफसर खान यांनी केली.
अफसर खान यांना ऐनवेळी एबी फॉर्म :2019 लोकसभा निवडणुकीत वंचित आणि एमआयएम हे नवीन राजकीय समीकरण समोर आले. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात वंचितच्या मतांमुळे एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील हे निवडून आले. मात्र, त्यानंतर विधानसभा निवडणुकीत वंचितला एमआयएम पक्षाकडून साथ मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्या युतीत फूट पडली. २०२४ च्या निवडणुकीत वंचिततर्फे आपला स्वतंत्र उमेदवार घोषित करण्यात आला. अफसर खान यांना उमेदवारी दिल्यानंतर, अर्ज सादर करताना त्यांना एबी फॉर्म देण्यात आला नाही. त्यामुळे स्वतंत्र लढण्याची घोषणा अफसर खान यांनी केली होती. त्यांनी तसा अर्ज देखील सादर केला; मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अखेरच्या काही मिनिटात त्यांचा एबी फॉर्म जोडण्यात आला. त्यामुळे ते अधिकृत उमेदवार झाले. प्रकाश आंबेडकर निवडणुकीत व्यस्त असल्याने एबी फॉर्म उशिरा आला, असं स्पष्टीकरण अफसर खान यांनी दिलं.