मुंबई Best Travel Places in Mumbai: घड्याळाच्या काट्यावर सतत धावत राहणारं शहर म्हणजे 'मुंबई'. या शहराचे अनेक किस्से-कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील. यातूनच मुंबईबद्दल एक आकर्षण आणि वलय निर्माण होतं. त्यामुळेच अबालवृद्धांना इच्छा असते की, आपण सुट्टीत मुंबईला जावं आणि शहर पाहावं. जिवाची मुंबई करुन यावंच. मुंबईची लोकल ट्रेन, इथल्या बेस्ट बस, मरीन ड्राईव्ह ही पर्यटकांची आवडती ठिकाणं. सध्या व्हॅकेशनचा हंगाम (Summer Vacation) सुरू आहे. शाळा-कॉलेजला सुट्टी पडून एक महिना उलटून गेलाय. त्यामुळं अनेकजण फिरून आले असतील. तर काहीजण फिरायला जाण्याचा बेत करत असतील. या उन्हाळी सुट्टीत तुम्ही जर लहान मुलांसह मुंबई फिरण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. मुंबईत अनेक पर्यटन स्थळं आहेत. जिथे तुम्ही फिरण्याचा आनंद घेऊ शकता. किंवा त्या ठिकाणची काही ऐतिहासिक माहिती सुद्धा मिळवू शकता. पण येथे जायचं कसं? तिथलं काय वैशिष्ट्य आहे? आणि येथे पाहण्यासारखं काय आहे? याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
1) जिजामाता उद्यान भायखळा (राणीची बाग) :तुम्हाला जर प्राणी, पक्षी आणि जगाच्या सहा खंडांमधील विविध प्रकारची झाडं पाहायची असतील तर भायखळातील वीर माता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच सर्वांच्या परिचयाची 'राणीची बाग' हा उत्तम पर्याय आहे. या बागेत तुम्हाला वाघ, बिबटे, तरस, अस्वल, हत्ती, पाणघोडा असे विविध प्राणी पाहायला मिळतील. तर, विविध प्रकारचे परदेशी प्राणी-पक्षी यात फ्लेमिंगो यासारखे पक्षी आहेत. तर याच ठिकाणी तुम्हाला पेंग्विनही पाहायला मिळतील. त्यासाठी अंटार्टिकाला जाण्याची गरज नाही. इतर जंगली पक्षी देखील तुम्हाला या बागेत पाहायला मिळतील. सोबतच जगाच्या सहा खंडांमधील विविध प्रकारची झाडं इथे पाहायला मिळतील.
राणीच्या बागेचं तिकीट किती? :राणीच्या बागेत तुम्हाला फिरायला जायचं असेल तरमध्य रेल्वेचं भायखळा रेल्वे स्थानक अतिशय जवळ आहे. या रेल्वेस्थानकाच्या पूर्वेला 'वीर माता जिजाबाई भोसले उद्यान' आहे. या उद्यानात जाण्यासाठी प्रौढांसाठी 50 रुपये तर लहान मुलांसाठी 25 रुपये असं तिकीट आहे. या उद्यानात जाण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळी 9 ते 11 आहे. मात्र हे उद्यान सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उघडे असते.
2) भाऊ दाजी लाड संग्रहालय: तुम्हाला जुनी मुंबई आणि मुंबईचा इतिहास जवळून पाहायचा असेल तर हे संग्रहालय उत्तम पर्याय आहे. हे संग्रहालय जवळपास शंभर वर्षापूर्वी व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय म्हणून ओळखलं जात होतं. 1975 मध्ये मुंबईचे पहिले वैद्यकीय पदवीधर, शहराचे पहिले भारतीय शेरीफ आणि संयुक्त संग्रहालय समिती यांच्या संयुक्त विद्यमानं त्याचं नामकरण करण्यात आलं होतं आणि याला सचिव 'भाऊ दाजी लाड' यांचं नाव देण्यात आलं. या संग्रहालयाची पायाभरणी 1862 मध्ये मुंबईचे गव्हर्नर सर हेंन्री बार्टल फ्रेरे यांनी केली होती. हे संग्रहालय वीर माता जिजाबाई भोसले उद्यानाच्या आत आहे. भायखळा पूर्वेला असलेलं हे संग्रहालय सजावटीच्या आणि औद्योगिक कलांचा खजिना म्हणून स्थापन झालं होतं. या संग्रहालयात भारतातील अनेक सुंदर हस्तकला संग्रहित करण्यात आल्या आहेत. या संग्रहालयात कला, हस्तकला तसंच मुंबईचा इतिहास जपण्यात आला आहे. संग्रहालय पाहण्यासाठी तुम्ही कधीही येऊ शकता. परंतु, 2022 पासून डागडुजीच्या कारणास्तव हे संग्रहालय पर्यटकांसाठी बंद करण्यात आलं आहे.
3) गेट वे ऑफ इंडिया: मुंबई शहराच्या दक्षिणेला समुद्रकिनारी ही एक लोभस दगडी कमान आहे. डिसेंबर 1911 मध्ये अपोलो बंदर, मुंबई (तेव्हाचे बॉम्बे) येथे ब्रिटिश सम्राट किंग जॉर्ज पाचवा आणि राणी मेरी यांच्या पहिल्या भेटीच्या स्मरणार्थ स्मारक म्हणून ही भव्य कमान बांधण्यात आली. ही कमान 16 व्या शतकातील इंडो-इस्लामिक स्थापत्य शैलीत बांधलेली आहे. या वास्तूची पायाभरणी मार्च 1913 मध्ये करण्यात आली. वास्तुविशारद जॉर्ज विटेट यांनी स्मारकाचं अंतिम डिझाइन 1914 मध्ये मंजूर केलं आणि त्याचं बांधकाम 1924 मध्ये पूर्ण झालं. याची उंची 26-मीटर इतकी असून, ही कमान बेसाल्ट दगडापासून बनवलेली आहे.
कसं जाणार? : तुम्हाला इथं जायचं असल्यास मध्य रेल्वेचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तर पश्चिम रेल्वेचं चर्चगेट ही दोन रेल्वे स्थानकं जवळची आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या बाहेरून तुम्हाला 116 नंबरची बस मिळेल. या बसचा शेवटचा स्टॉप 'गेट वे ऑफ इंडिया' आहे. बसचं तिकीट सहा रुपये असून, 'गेटवे ऑफ इंडिया' ही वास्तू पाहण्यासाठी कोणतंही शुल्क नाही. इथे जाण्याची योग्य वेळ म्हणजे सूर्यास्ताची आहे. मात्र या ठिकाणी दिवसभर कधीही आपण जाऊ शकतो.
4) वरळीचा किल्ला :तुम्हाला जर गड किल्ले पाहण्याची आवड असेल तर मुंबईतील 'वरळीचा किल्ला' हा एक उत्तम पर्याय आहे. हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधलेला आहे. पोर्तुगीजांनी याची स्थापना 1561 साली केल्याची नोंद आहे. मुंबई हे सात बेटांनी मिळून निर्माण झालेलं एक शहर आहे. या सात बेटांवर एकूण 11 किल्ले होते. यातील वरळी बेटावरील टेकडीवर बांधलेला किल्ला म्हणजे वरळीचा किल्ला. या किल्ल्याच्या तळ भागाकडं जाड आणि भक्कम होत जाणाऱ्या तटबंदीच्या भिंती आहेत. या किल्ल्याच्या दक्षिण दिशेला असलेला त्रिकोणी आकारातील बुरुज. या बुरुजावर अजस्त्र घंटा बांधण्यासाठी उभारण्यात आलेला मनोरा. समुद्राच्या दिशेनं असलेल्या तीन तोफा. ही पोर्तुगीज कालीन स्थापत्य शास्त्राची वैशिष्ट्ये या किल्ल्यात तुम्हाला पाहायला मिळतील. या किल्ल्याची सध्या पुरातत्त्व विभागानं डागडुजी केली असल्यानं हा किल्ला सुस्थितीत आहे.
कसं पोहचणार वरळी किल्ल्यावर ?: या किल्ल्याकडं तुम्हाला जायचं असल्यास वरळी कोळीवाड्या जवळच्या आदर्श नगर बस स्टॉप जवळून समुद्रकिनाऱ्याच्या दिशेनं जाणारी एक गल्ली दिसते. या गल्लीतून तुम्ही साधारण दहा मिनिटे चालल्यास थेट वरळी किल्ल्यावर पोहोचता. वरळी कोळीवाड्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला दादर रेल्वे स्थानक जवळ आहे. दादर रेल्वे स्थानकातून वरळी कोळीवाड्यापर्यंत जाण्यासाठी बस, शेअर टॅक्सी आहेत. इथे जाण्याचा योग्य वेळ म्हणजे सूर्योदय किंवा सूर्यास्त.
5) कमला नेहरू पार्क (हँगिंग गार्डन) :मलबार हिल म्हणजे मलबार टेकडीच्या माथ्यावर असलेली गार्डन म्हणजेच हँगिंग गार्डन. हे मुंबईतील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. इथून केवळ अरबी समुद्राचा विस्तीर्ण पसाराच नाही तर मुंबईच्या संपन्नतेचं भव्य दृश्यही दिसतं. म्हणजे इथून तुम्हाला जवळपास अर्धी मुंबई दिसते. याला फिरोजशाह 'मेहता गार्डन' म्हणूनही ओळखलं जातं. या बागेतून सूर्यास्ताचं दृश्य अतिशय सुंदर दिसतं. प्राण्यांच्या आकारात कापलेली सुंदर झुडुपं हे उद्यानाचं खास आकर्षण आहे. या उद्यानाचं मुख्य आकर्षण म्हणजे म्हातारीचा बूट. ही एक प्रकारची इमारतच आहे. बच्चे कंपनीला या बुटाजवळ खेळण्यास मज्जा येते. अलिकडच्या काळात अनेकजण या बुटाबरोबर सेल्फी काढून घेतात.
गार्डनमध्ये जाण्यासाठी शुल्क नाही: या उद्यानाला तब्बल 136 वर्ष पूर्ण झाली असून, या उद्यानाच्या पायथ्याला एक पाण्याची टाकी आहे. या टाकीच्या पुनर्बांधणीसाठी सुरक्षेच्या कारणास्तव पालिकेनं हे गार्डन सध्या पर्यटकांसाठी बंद केलंय. मुंबईच्या हँगिंग गार्डनमध्ये जाण्यासाठी कोणतं शुल्क नाही. तुम्ही सातही दिवस पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत कधीही भेट देऊ शकता. इथे जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून 108 क्रमांकाची बस मिळते. तुम्ही जर पश्चिम रेल्वेतील ग्रँड रोड या स्थानकावरून जात असाल तर अधिक जवळ पडते.