ठाणे - 1 कोटी 68 लाखांच्या दागिन्यांसह दोन लाखांची रोकड असलेली बॅग शिवशाही बसमधून चोरट्याच्या टोळीने पळविल्याचे लक्षात येताच बस चालकाने त्या चोरट्याच्या कारचा फिल्मी स्टाईल पाठलाग केला. मात्र चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरल्याची घटना घडली असून, मुंबई-नाशिक महामार्गावरील शहापूर तालुक्यातील उंबरमाळी गाव हद्दीत हा प्रकार घडलाय. याप्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात दागिने विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याच्या टोळीविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केलाय.
सोने-चांदीचे दागिने बनवून विक्री करण्याचा व्यवसाय : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार किरणकुमार पुरोहित ( वय 44, रा. भाईंदर पूर्व )यांचा सोने-चांदीचे दागिने बनवून विक्री करण्याचा व्यवसाय आहे. किरणकुमार हे राज्यातील विविध भागातील शहरातील ज्वेलर्स दुकानदारांना सोने-चांदीच्या दागिन्यांची विक्री करतात. त्यातच शुक्रवारी नेहमीप्रमाणे नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, लोणी, कोपरगाव, राहता आणि संगमनेर या शहरांमध्ये जाऊन पुरोहित यांनी मंगळसूत्र आणि विविध प्रकारच्या छोट्या दागिन्यांची विक्री केलीय. त्यांनतर उरलेले सोने चांदीचे दागिने आणि व्यापारातून मिळालेली रोख रक्कम बॅगेत घेऊन परतीच्या प्रवासाला निघाले होते.
संधीचा फायदा घेत बॅग लंपास : परतीच्या प्रवास करत असतानाच शनिवारी मध्यरात्री नाशिक-बोरिवली शिवशाही बसने प्रवास सुरू केल्यानंतर रात्री 1:30 वाजता ही बस शहापूर तालुक्यातील उंबरमाळी गाव हद्दीतील मुंबई-नाशिक महामार्गावर असलेल्या हॉटेल फेमस येथे चहापाणी घेण्यासाठी थांबविण्यात आली होती. त्यावेळी किरणकुमार पुरोहित यांनी आपल्याजवळ असलेली सोने-चांदीची बॅग बसमधील आसनावर ठेवून पाणी बॉटल घेण्यासाठी खाली उतरले. त्याच संधीचा फायदा घेऊन प्रवासात सोबत असलेल्या अज्ञात चौघांनी बॅग लंपास करत कारमधून मुंबईच्या दिशेने पोबारा केला. मात्र चोरटे बॅग घेऊन जात असल्याचा प्रकार बस कंडक्टर यांच्या सांगण्यातून पुरोहित यांच्या लक्षात आला. त्यानंतर बस चालकाने कारचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र कार चोरट्यांनी भरधाव वेगात सुसाट चालविल्याने कार महामार्गावर दिसून आली नाही.
पोलीस ठाणे गाठून नोंदवली तक्रार : दरम्यान, बसमधून आपल्याजवळील मौल्यवान सोने-चांदीच्या दागिने लंपास केल्यानं किरणकुमार पुरोहित यांना धक्का बसलाय. त्यांनी कसारा पोलीस ठाणे गाठून घडलेल्या प्रकारचा जबाब नोंदवून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश गावित हे करीत आहेत. यासंदर्भात तपास अधिकारी गावित यांच्याशी संपर्क साधला असता घटनास्थळ आणि महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करीत असून, त्या फुटेजच्या आधारे दागिने पळविणाऱ्या चोरट्याचा शोध घेत असल्याचं सांगितलंय.
हेही वाचा -