महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विशाळगडावरील उत्तर शिवकालीन राममंदिर तुम्ही पाहिलंय का? 17 व्या शतकातील तांब्याच्या मूर्तींचं विशेष आकर्षण - UTTAR SHIVKALIN RAM MANDIR

विशाळगडावर अनेक मंदिरं आहेत. त्यातीलच एक म्हणजे 'उत्तर शिवकालीन राममंदिर.' आहे. या मंदिराविषयी आपण जाणून घेऊया...

Uttar Shivkalin Ram Mandir at Vishalgad Fort Kolhapur, special attraction of 17th century copper idols Ram Sita Laxman
विशाळगडावरील उत्तर शिवकालीन राममंदिर (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 12, 2025, 9:24 AM IST

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील 'विशाळगड' शिवरायांच्या कालखंडातील अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यात पश्चिमेकडं वसलेल्या या किल्ल्यावर शिवउत्तरकाळातील प्रभू श्रीरामांचं मंदिर पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र बनलंय. या मंदिरातील पूजेचा मान जंगम कुटुंबीयांकडं आहे. सध्या त्यांची पाचवी पिढी मंदिरातील धार्मिक कार्यासाठी पुढाकार घेत आहेत. तर या मंदिरात 17 व्या शतकातील प्राचीन प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मणाची तांब्याची मूर्ती आहे. पण या मंदिराला भेट देण्यासाठी पर्यटक यावेत, यासाठी या ठिकाणी सोयी सुविधा करणं गरजेचं आहे.

विशाळगडावर अनेक मंदिरं : छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आणि छत्रपती ताराराणींच्या वास्तव्यानं पुनित झालेल्या ऐतिहासिक विशाळगड किल्ल्यावर हिंदू दैवतांची 12 मंदिर आहेत. विशाळगडावर चढाई करतानाच डाव्या बाजूला महादेवाचं छोटसं मंदिर आहे. गडावर येणारे अनेक शिवप्रेमी आणि पर्यटक या मंदिरात जाऊन शिवशंकराचं दर्शन घेतात. याचबरोबर गडावर चारहीबाजूंनी अनेक मंदिर आहेत. यामध्ये पायथ्याला गणेश मंदिर, खोकलाई देवी मंदिर, वाघजाई मंदिर विठ्ठलाई मंदिर, भावकाई देवी मंदिर, नरसोबा मंदिर, रामेश्वर मंदिर, विठ्ठल मंदिर, राम मंदिर, गणेश मंदिर, भगवंतेश्वर मंदिर अमृतेश्वर मंदिर यांचा समावेश आहे. मात्र, प्रशासनाकडून या मंदिरांची माहिती देणारे कोणतेही फलक गडाच्या दर्शनी भागात न लावल्यानं पर्यटकांना ही मंदिरं शोधावी लागतात.

विशाळगडावरील उत्तर शिवकालीन राममंदिर (ETV Bharat Reporter)

प्रशासनाचं दुर्लक्ष : या मंदिरांमध्ये छत्रपती शिवरायांच्या काळातील काही जुन्या प्राचीन मूर्ती अजूनही जशाच्या तशा आहेत. यासह विशाळगडावर मुंढा दरवाजा, बाजीप्रभू देशपांडे यांनी ज्या तोफेच्या आवाजावर स्वराज्यासाठी प्राणाची आहुती दिली ती ऐतिहासिक तोफ, अहिल्याबाईंची समाधी, वेताळ टेकडी, कोकणी दरवाजा, माचाळदुर्ग पॉईंट, बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांची समाधी, पश्चिमेचा तटबंदी बुरुज, दगडी पूल, सतीचे तळे, शिवकालीन पंतप्रतिनिधी राजवाडा, चौकोनी विहीर, अर्धचंद्र विहीर, मारुती टेकडी, टकमक टोक अशी ऐतिहासिक ठिकाणं विशाळगडावर आहेत. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळं पर्यटक गडाकडं पाठ फिरवतात. त्यामुळं या ठिकाणी चांगल्या सोयी-सुविधा देण्यात याव्या, अशी मागणी केली जात आहे.

जंगम कुटुंबीयांकडं राम मंदिरातील पूजेचा मान : या गडावर छत्रपती शिवरायांच्या कालखंडानंतरच्या सतराव्या शतकातील राम मंदिर आढळते. गडावर उत्खननाचं काम सुरू असताना याच ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मण यांची तांब्याची मूर्ती आढळली. तेव्हापासून हे मंदिर अस्तित्वात आहे. 1980 साली येथील नागेश जंगम कुटुंबियांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. दरवर्षी रामनवमी आणि अनेक धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी होतात. तसंच जंगम कुटुंबियांची पाचवी पिढी या मंदिराच्या धार्मिक कामात आघाडीवर असल्याचं नागेश जंगम यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. विशाळगड परिसरातील हिंसाचार रोखण्यात पाऊस ठरला अडचणीचा, कोल्हापूर पोलिसांचा उच्च न्यायालयात दावा - Vishalgad Encroachment
  2. विशाळगडावरील दंगा संभाजी भिडे यांच्या धारकऱ्यांनी केला : अ‍ॅड प्रकाश आंबेडकर यांचा आरोप - Vishalgad Violence Case
  3. विशाळगडावरील अतिक्रमण विरोधी कारवाईला उच्च न्यायालयाची स्थगिती, सप्टेंबरपर्यंत कारवाई न करण्याचे निर्देश - Vishalgad Encroachment

ABOUT THE AUTHOR

...view details