माढा लोकसभा निवडणुकीच्या समीकरणाविषयी बोलताना धैर्यशील मोहिते पाटील पुणेUttam Jankar Meeting: राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अनपेक्षित घटना घडताना पाहायला मिळत आहेत. माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढणार आहेत. तर दुसरीकडे दोन दिवसांपूर्वीच भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणारे अजित पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांनी आज (17 एप्रिल) शरद पवार यांची भेट घेतली.
मोहिते पाटील विरुद्ध निंबाळकर अशी होणार लढत :माढा लोकसभा मतदार संघाच्या संदर्भात धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज उत्तम जानकर यांच्या सोबत पवार यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर पवार यांनी तीन दिवसांपूर्वी धैर्यशील मोहिते पाटील यांचा पक्ष प्रवेश केला आहे. यामुळे मोहिते पाटील विरुद्ध रणजितसिंह निंबाळकर अशी ही लढत होणार आहे. अशातच नाराज असलेले उत्तम जानकर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. दोन दिवसांपूर्वी जानकर यांनी विमानवारी करत फडणवीस यांची भेट घेतली आणि नाराजी दूर झाली असं सांगितलं गेलं; पण असं असताना आज जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील भेट घेतली आहे. एकूणच माढाच्या संदर्भात कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबत येत्या 19 तारखेला कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
जानकर, मोहिते यांनी एकत्र यावं ही पवारांची इच्छा :याबाबत उत्तम जानकर म्हणाले की, माढा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवार यांची बैठक झाली आहे. त्यांची इच्छा होती की, जानकर आणि मोहिते यांनी एकत्र यावं. याबाबत १९ तारखेला माळशिरस येथे याबद्दल चर्चा होईल. २ ते ३ दिवसात दुसरी बैठक होईल. माढा मधील लोकांनी काय कामं केली पाहिजे याबद्दल चर्चा झाली. आमच्या तालुक्यातील लोकांची इच्छा आहे की, पवार साहेबांसोबत जावं. कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन १९ तारखेला अंतिम निर्णय होईल. तसेच मी प्रवेश कुठल्याच पक्षात करणार नाही. मी सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटात आहे. जरी मी या गटात असलो तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलो असल्याचं यावेळी जानकर यांनी सांगितलं.
राजकीय वैर संपावं हीच भूमिका :आजच्या बैठकीबाबत धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की, आजच्या बैठकीत पवार साहेबांनी मार्गदर्शन केलं. १९ तारखेला मेळावा होईल आणि त्यातून निर्णय होईल. आमच्यातील राजकीय वैर संपायला पाहिजे हीच भूमिका आहे. रामराजे महायुती सोबत आहेत; पण त्यांचे सर्व कुटुंब आमच्या सोबत आहे. आम्ही चांगल्या मताने निवडून येऊ, असं यावेळी ते म्हणाले.
हेही वाचा:
- 'मिले सूर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा'; कट्टर राजकीय विरोधक अडसूळ-राणा एकत्र, अनेक वर्षांचं शत्रुत्व संपलं - Lok Sabha Election 2024
- शिवसेनेच्या नेत्याला भाजपाची पालघरमधून उमेदवारी; भाजपाच्या लेटरहेडची काय आहे सत्यता ? - BJP Fake Letter Head
- प्रकाश आंबेडकरांना अकोला लोकसभा मतदार संघात एमआयएमचा पाठिंबा; असदुद्दीन ओवैसींचा मनोज जरांगेंना 'हा' सल्ला - Lok Sabha Election 2024