आमदार गायकवाड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्या भाजपाच्या 40 हून अधिक पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल ठाणे Ulhasnagar Firing Case : भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी उल्हासनगर मधील मध्यवर्ती पोलीस ठाण्यात 40 हून अधिक भाजपा कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, हे सगळे कार्यकर्ते गोळीबार प्रकरणी आरोपी असलेल्या आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थनासाठी उल्हासनगरच्या न्यायालयाबाहेर घोषणाबाजी करत होते.
मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल :हिल लाईन पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याप्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांच्या तिघांना उल्हासनगरच्या न्यायालयात 3 फेब्रुवारी रोजी हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी न्यायालयात तिन्ही आरोपींना पोलीस बंदोबस्तामध्ये घेऊन येत असतानाच कार्यकर्त्यांनी न्यायालयाबाहेर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला. त्यामुळं भाजपाच्या कार्यकर्त्यांवर उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस उपआयुक्त डॉ. सुधारक पठारे यांनी दिली आहे.
'या' पदाधिकाऱ्यांचा होता समावेश : यामध्ये भाजपचे पदाधिकारी गुड्डू खान, मोना सेठ, निलेश बोबडे, शिलाराज, सुरज खान, अंजली खामकर, विद्या त्रिंबके, भावेश तोल, सरिता जाधव, लावण्य दळवी, यशोदा माळी व इतर 25 ते 30 कार्यकर्त्यांचाही यात समावेश आहे. आमदार गणपत गायकवाड समर्थकांनी जोरजोराने घोषणाबाजी करत पोलीस उपायुक्त विशेष शाखा आणि शहर यांच्या कडील मनाई आदेशाचा भंग केला. त्यामुळं त्यांच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(3) 135 अधिवेशन सरकारतर्फे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्यातून देण्यात आली आहे.
11 दिवसांची पोलीस कोठडी :भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांना उल्हासनगर येथील न्यायालयात हजर करण्यात आलं. तेव्हा न्यायालयानं त्यांना 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसंच मिळालेल्या माहितीनुसार गणपत गायकवाड यांना कळवा पोलीस स्टेशनच्या पहिल्या मजल्यावर ठेवण्यात आलं आहे. दरम्यान, जमिनीच्या वादातून गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाडवर पोलीस ठाण्यात गोळ्या झाडल्याचं पोलीस उपायुक्त दत्ता शिंदे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा -
- पोलीस ठाण्यात गोळीबार म्हणजे स्वार्थासाठी महायुतीत गँगवार - संजय राऊत
- स्वतःला राजा समजणाऱ्यांना जनतेनं घरी बसवलं पाहिजे, आमदार गोळीबार प्रकरणावर प्रकाश आंबेडकर कडाडले
- गोळीबार प्रकरणी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांना 11 दिवसांची पोलीस कोठडी