महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आमचं सरकार आलं तर तुम्हाला जेलमध्ये टाकू; उद्धव ठाकरेंचा महायुतीच्या नेत्यांना गर्भित इशारा - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी जोरात सुरू आहे. उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.

MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
संग्रहित छायाचित्र (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 16, 2024, 11:25 AM IST

नाशिक : "मला शक्य आहे तेच मी बोलेन, मी म्हणजे देवेंद्र फडणवीस नाही, मी नाशिकला दत्तक घेणार अशी घोषणा करणार नाही. देवेंद्र फडणवीसांनी नाशिकला वाऱ्यावर सोडून गद्दारांना डोक्यावर घेतलं," असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपावर केला. नाशिकला महाविकास आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरे बोलल होते. "आमच्या कार्यकर्त्यांवर तुम्ही खोट्या केस टाकत आहात, तडीपार करत आहात. मात्र आम्ही सूडबुद्धीनं वागलो तर तुमच्या दसपटीनं वागू. आमचं सरकार आलं तर तुम्हाला देखील जेलमध्ये टाकू," असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.

आमचं सरकार आलं तर तुम्हाला जेलमध्ये टाकू :राज्यात गुंडगिरी वाढत आहे. निवडणूक आयोग तुमचा नोकर आहे, मतांसाठी तुम्ही धर्मयुद्ध करा, असं देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. लाडकी बहिणींना नुसते पैसे देऊन नाही चालणार, त्यांचं संरक्षण करणं देखील गरजेचं आहे. विरोधक आपला महाराष्ट्र गुजरातच्या चरणी वाहण्यासाठी निघाले आहेत. त्यांना मतदान करू नका, मी माझ्यासाठी लढत नाही, महाराष्ट्रासाठी लढत आहे. माझ्यासोबत जोपर्यंत तुम्ही आहे, तोपर्यंत मी संपणार नाही. आमच्या लोकांवर तुम्ही खोट्या केस टाकत आहात, तडीपार करत आहात. आम्ही सूडबुद्धीनं वागलो तर तुमच्या दसपटीनं वागू. आमचं सरकार आलं तर तुम्हाला देखील जेलमध्ये टाकू. पुढचं सरकार आमचं आहे, त्यामुळे पोलिसांनी देखील जनतेचं काम करावं," असा इशाराही त्यांनी पोलिसांना दिला.

महाराष्ट्रात फक्त ठाकरे गॅरंटी चालते :"यावर्षी आपली नाशिकमध्ये तिसरी सभा आहे. कुठली सभा मोठी हे कळत नाही. आजच्या सभेतही माझ्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. अमित शाह आणि नरेंद्र मोदी येतायत आणि मला आव्हान देत आहेत. अमित शाहांनी मला विचारलं तुम्ही राम मंदिरात का गेले नाही. मी म्हणालो तुम्ही मंदिरातील गळती थांबवा मी जातो. महाराष्ट्रात मोदी गॅरंटी नाही चालणार, इथं फक्त ठाकरे गॅरंटी चालते, दोन महिन्यांपूर्वी अल्पसंख्यांक आयोग सरकारनं स्थापन केला. या आयोगात अल्पसंख्यांक प्रतिनिधी नाही," असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर टीका केली

मोदीजी बाळासाहेब तुमच्या वर्गात नव्हते :"मोदीजी बाळासाहेब तुमच्या वर्गातले मित्र नव्हते. बाळासाहेब हिंदू हृदयसम्राट आहेत. तुम्ही त्यांना हिंदू हृदयसम्राट बोलायला शिका. आठवण द्यायची झालं तर शिवाजी पार्कला महाविकास आघाडीची सभा झाली. तेव्हा माझ्यासमोर राहुल गांधींनी आपल्या शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाला अभिवादन केलं आहे. जसं बाबासाहेबांच्या प्रेमाचं थोतांड सांगत आहात, तसंच जर तुमचं प्रेम हिंदू हृदयसम्राटांवर खरोखर असेल, तर तुमच्या अमितशेठला विचारा बाळासाहेबांच्या खोलीत त्यांनी दिलेला शब्द का मोडला? कठीण काळात ज्या शिवसेनेनं तुम्हाला पाठिंबा दिला होता, ती शिवसेना का संपवत आहात ?," असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

डी एल कराड यांना आमदार करणार : "नाशिक पश्चिममधून माकपचे डॉक्टर डी एल कराड निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र त्यांनी माझ्या एका शब्दावर उमेदवारी मागे घेतली. मीही त्यांना विधिमंडळामध्ये नेण्यासाठी शब्द दिल्याचं तुमच्या सगळ्यांसमोर सांगतो," असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

हेही वाचा :

  1. VIDEO : उद्धव ठाकरे यांची औसामध्ये पुन्हा एकदा तपासली बॅग; म्हणाले, "या, लाजू नका..."
  2. "थापा मारुन ते थकतच नाही, मोदी यांच्याकडं कुठली दैवी..."-उद्धव ठाकरेंचा प्रचारादरम्यान हल्लाबोल
  3. "6 तास थांबून फक्त 40 सेकंद भेट, ठाकरेंच्या शिवसेनेचं काम करणार नाही", इच्छुक उमेदवाराची आक्रमक भूमिका

ABOUT THE AUTHOR

...view details