मुंबई Uddhav Thackeray On Badlapur Case : बदलापूर इथं घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे. बदलापूरला घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दौऱ्यावर फिरत आहेत. महाराष्ट्रात विकृतीचा व्हायरस पसरला आहे. शाळेत आपल्या मुली शाळेत सुरक्षीत नाहीत म्हणून बदलापूरमध्ये उद्रेक झाल्याचा हल्लाबोल उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला. या उद्वेग आणि उद्रेकाला वाचा फोडण्यासाठी 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंद म्हणून पाळण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
"लाडकी बहीण योजना आणली, मात्र राज्यात बहीण कुठे सुरक्षित आहे? फक्त आणि फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना आणली. या योजनेच्या प्रसार आणि प्रचारासाठी एक घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि दोन मुख्यमंत्री कामाला लागले आहेत. लाडकी बहीण राज्यात सुरक्षित नाही. बदलापूर घटना ही जनभावनेचा उद्रेक, आक्रोश आहे. त्यामुळंच जनता रस्त्यावर उतरलीय. परंतु हा उद्रेक, आक्रोश होत असताना घटनाबाह्य मुख्यमंत्री कुठे होते? ते रत्नागिरीत लाडक्या बहिणीच्या कार्यक्रमात व्यग्र आहेत". - उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री
फोटोसाठी मुख्यमंत्री राख्या बांधून घेत आहेत : बदलापुरात दोन चिमुकल्यांवर अत्याचाराच्या घटनेमुळं संपूर्ण देशात याचे पडसाद उमटत आहेत. तर या घटनेवरून राज्यातील माता-भगिनी सुरक्षित नसल्याची टीका विरोधकांनी राज्य सरकारवर केली. "बदलापूर शहर हे मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील आहे. या घटनेनंतर अजूनही मुख्यमंत्री तिकडे फिरकले नाहीत. रक्षाबंधनच्या रात्री मुख्यमंत्री कुठे होते? याचा तपास करा. राज्यातील अन्य भागात लाडक्या बहिणीच्या प्रचारासाठी फिरताहेत. पण अद्यापपर्यंत त्यांनी बदलापूरमध्ये भेट दिली नाही. फक्त फोटोसाठी लाडक्या बहिणींकडून राखी बांधून घेतात. पण लाडक्या बहिणीची सुरक्षा आहे कुठे?" असा संतप्त सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित करत राज्य सरकारवर निशाणा साधला.