मुंबई - येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू झालीय. एकीकडे राजकीय पक्षांनी रणनीती आखण्याचे काम सुरू केले असतानाच दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अनेक विषयावरून आरोप-प्रत्यारोपांबाबत चांगलाच कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे आता शनिवारी दसरा आहे. खरं तर दसरा मेळावा आणि शिवसेनेचं एक वेगळंच नातं आहे. गेल्या काही वर्षांपासून दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेकडून पारंपरिक दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात येतंय. शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा दसरा मेळावा अन् शिवाजी पार्क यांचे समीकरण वर्षानुवर्ष चालत आलंय. मात्र 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतून बंड केलं. यानंतर शिवसेनेमध्ये फूट पडून दोन गट पडले. परिणामी मागील दोन वर्षांपासून शिवसेनेचे 2 दसरा मेळावे झालेत. एक शिंदेंच्या शिवसेनेचा आणि दुसरा ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा झाला होता. शनिवारी या दोन्ही शिवसेनेचे दसरा मेळावे होणार आहेत. या धर्तीवर दसरा मेळाव्याची दोन्हीकडून जोरदार तयारी करण्यात आली असून, दसरा मेळावातून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागलंय.
ठाकरेंची मशाल धगधगणार :गेल्या वर्षी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गट आणि ठाकरे गट यांना न्यायालयात धाव घ्यावी लागली होती. यानंतर न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला शिवाजी पार्क येथे मेळावा घेण्याची परवानगी दिली होती. त्यामुळं शिंदेंच्या शिवसेनेला आझाद मैदान येथे दसरा मेळावा घ्यावा लागला होता. तर यंदाही ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होतोय तर शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदान येथे होतोय. दोन्ही पक्षांकडून दसरा मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात आलीय. याचाच एक भाग म्हणून शिवसेना (ठाकरे गटाने) दसरा मेळाव्याचा तिसरा टीझर लॉन्च करत विरोधकांवर निशाणा साधलाय. टीझरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या आवाजात विरोधकांना एक प्रकारे इशाराच देण्यात आलाय. टीझरमधून शिवसेना ठाकरेंची मशाल शिवतीर्थावर धगधगणार असल्याचं टीझरमध्ये म्हणण्यात आलंय.