मुंबई Uddhav Thackeray On Maharashtra Band :बदलापूर घटनेच्या निषेधार्थ शनिवारी (24 ऑगस्ट) महाविकास आघाडीकडून पुकारण्यात आलेला बंद हा बेकायदेशीर असल्याचा उच्च न्यायालयानं निर्वाळा दिला आहे. राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी न्यायालयाचा आदर करत बंद मागे घ्यावा, असं आवाहन केलं. यानंतर शिवसेना (ठाकरे गटाचे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत, उद्याचा बंद तूर्तास मागे मात्र राज्यभर गाव-खेड्यात, चौका चौकात तोंडाला काळी फीती बांधून बदलापूर घटनेच्या निषेध करणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
कोर्टाचा आदर पण निर्णय मान्य नाही :माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले "न्यायालयानं तत्परतेनं या बंदला मनाई केली आहे. न्यायालय बंदबाबत जितक्या तत्परतेनं निर्णय घेतला, तितक्याच तत्परतेनं गुन्हेगारांना शिक्षा द्यावी. न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य नाही. परंतु न्यायालयाचा आदर आम्हाला ठेवावा लागतो. या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जावू शकतो. सर्वोच्च न्यायालयात जाण्याची ही वेळ नाही. कारण सर्वोच्च न्यायालयात जाणार, अपील होणार या संपूर्ण प्रक्रियेला वेळ लागणार आहे. शरद पवार यांनी उद्याचा बंद मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. आम्ही बंद जरुर मागे घेत आहोत." राज्यभर प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात, शहरातल्या आणि गावातल्या मुख्य चौकात महाविकास आघाडीचे सगळे नेते आणि कार्यकर्ते तोंडाला काळ्या फिती बांधून आणि हातात काळे झेंडे घेऊन निषेध करणार आहोत," असं सांगतं उद्धव ठाकरे यांनी आंदोलन करणार असल्याची माहिती दिली.