मुंबई :आनंद दिघे असते तर त्यांनी शिंदेला (अप्रत्यक्ष, अक्षय शिंदे) या पापाबद्दल गोळी घातली असती, असे उद्गार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यात काढले. तर भाजपाच्या वतीनं महाराष्ट्रात केवळ सत्ता जिहाद सुरू असून, अदानींच्या घशात महाराष्ट्र घातला जात आहे. आपलं सरकार आल्यानंतर हे सर्व निर्णय रद्द करण्याची घोषणा यावेळी ठाकरे यांनी केली. तर जमलेल्या शिवसैनिकांना त्यांनी मराठी एकजूट अभेद्य ठेवण्याची शपथ दिली.
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा :मुंबईतील शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि महायुती सरकारवर जोरदार टीका केली. उपस्थित शिवसेनिकांना बाळासाहेबांचे विचार धगधगत ठेवावेत आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सरकार आणावे व आपला मुख्यमंत्री करावा, असं आवाहन केलं. या मेळाव्यासाठी राज्यभरातून हजारो शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल झाले होते. सुरुवातीला पावसाचं सावट मेळाव्यावर होतं. मात्र, नंतर मेळावा भाषणांनी रंगत गेला. यावेळी संजय राऊत, सुषमा अंधारे आणि आदित्य ठाकरे यांचीही जोरदार भाषणं झाली.
दिघेंनी शिंदेंना गोळी घातली असती : बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला दिघे यांनी नक्कीच गोळी घातली असती. मात्र, याबद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांनी केवळ 'शिंदे' असा उल्लेख करून शिंदेला दिघेंनी नक्कीच त्याच्या पापाबद्दल गोळी घातली असती, असं अप्रत्यक्ष उद्गारून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. सरकारनं गोमातेला राज्य मातेचा दर्जा दिल्याबद्दल बोलताना ठाकरे म्हणाले की, "राज्यमातेचा दर्जा दिल्यानंतर आता गाईचं हंबरणे राज्यभाषा असणार का? त्यापेक्षा महाराष्ट्रातील महिला भगिनींवर होणाऱ्या अत्याचारांकडं लक्ष द्या."