सातारा :लोकसभा सभागृहात 'वन नेशन, वन इलेक्शन' विधेयक मांडलं जाणार असल्यानं भाजपानं आपल्या खासदारांना व्हीप बजावूला. मात्र पक्षानं व्हीप बजावूनही गैरहजर राहणाऱ्या खासदारांना भाजपानं नोटीसा पाठवण्याची तयारी सुरू केली. त्यामध्ये साताऱ्याचे खासदार आणि छत्रपतींचे थेट तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे भाजपा उदयनराजे भोसले यांनाही नोटीस बजावण्याची शक्यता आहे.
व्हीप बजावूनही उपस्थित का राहिला नाहीत? :लोकसभेत 'एक देश, एक निवडणूक', हे अत्यंत महत्वाचं विधेयक मांडलं जाणार होतं. त्यासाठी भाजपाकडून आपल्या खासदारांना व्हीप बजावण्यात आला होता. तरीही वीसहून अधिक खासदारांनी दांडी मारली. त्यामुळं गैरहजर का राहिलात?, याचा खुलासा करावा, अशी नोटीस काढण्याची तयारी भाजपाकडून सुरू झाली आहे. त्यामध्ये साताऱ्याचे भाजपा खासदार उदयनराजेंचाही समावेश आहे.
भाजपाकडून कारणे दाखवा नोटीस :वन नेशन, वन इलेक्शन, हा भाजपासाठी महत्त्वाचा विषय आहे. यासंदर्भातील विधेयक लोकसभेत मांडलं जात असताना भाजपाच्या सर्व खासदारांनी उपस्थित राहण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. तरीही 20 पेक्षा अधिक खासदार मंगळवारी लोकसभेत अनुपस्थित होते. त्यामुळे पक्षानं त्यांना कारणं दाखवा नोटीसा काढण्यास सुरूवात केली आहे.