पुणे/सातारा : छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून सुटण्यासाठी 'पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं, छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात परतले', असा दावा अभिनेते राहुल सोलापूरकर (Rahul Solapurkar) यांनी केला होता. या विधानावर चौफेर टीका झाल्यानंतर आता राहुल सोलापूरकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र, त्यांच्याविरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहेत. तर आता याप्रकरणी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले उदयनराजे भोसले? :औरंगजेबाच्या सरदारांना लाच देऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका करून घेतल्याचं वक्तव्य राहुल सोलापूर यांनी एका पॉडकॉस्ट मुलाखतीत केलं होतं. त्यावर छ. शिवाजी महाराजांचे थेट वंशज खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले आहेत. "शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांची जीभ हासडली पाहिजे. दिसेल तिथं ठेचून काढलं पाहिजे. अशा औलादींना गोळ्या घातल्या पाहिजेत", असा संताप त्यांनी व्यक्त केला.
शिवाजी महाराजांनी लोकशाहीचा पाया घातला: छ. शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांनी नाक घासून माफी मागावी, अशी मागणी राज्यभरातून होत आहे. याच अनुषंगानं खासदार उदयनराजेंनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. महापुरुषांबद्दल अशी वक्तव्ये करणाऱ्यांना जनतेनं दिसेल तिथं ठेचून काढलं पाहिजे. गोळ्या घातल्या पाहिजेत. आपण ज्या लोकशाहीत वावरतो, त्याचा पाया छत्रपती शिवाजी महाराजांनी रचला आहे. असं असताना त्यांच्याबद्दल अशी गलिच्छ विधानं करतात. ते पाहताना मलाच नाही तर सर्व शिवभक्तांना वेदना झाल्याचं उदयनराजे म्हणाले.
अशा लोकांमुळे देशाच्या अखंडतेला धोका :खासदार उदयनराजे म्हणाले, "राहुल सोलापूरकरसारख्या लोकांना लाचेच्या पलीकडं काही समजत नाही. उचलली जीभ लावली टाळ्याला, असा हा प्रकार आहे. त्यांच्यासारख्या लोकांच्या विकृतीत वाढ झाली तर देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल. वेगवेगळ्या जाती धर्मात तेढ निर्माण होईल. त्यामुळं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांच्या जिभा हासडल्या पाहिजेत.
फिल्म इंडस्ट्रिजने त्यांना थारा देऊ नये : "शिवाजी महाराजांचे विचार आपण जपले नाही तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. विकृत विधाने करणाऱ्यांना फिल्म इंडस्ट्रीमधील लोकांनी थारा देऊ नये," असं आवाहनही खासदार उदयनराजेंनी केलंय. "मला वाटतं त्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे," असंही उदयनराजे म्हणाले.