मुंबई Lok Sabha Election Results 2024 :मुंबईतील दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे विजयाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे या मतमोजणी केंद्राबाहेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली आहे. गद्दारांना अक्कल शिकवली अशा आशयाच्या घोषणा दिल्या जात आहेत. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांपैकी चार लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आघाडीवर असल्याचे दिसते आहे. तर दोन मतदारसंघात भाजपा विजयाच्या वाटेवर आहे.
भाजपाच्या कार्यालयाबाहेर शुकशुकाट :कोणतीही निवडणूक असली की, भाजपाच्या मुंबई कार्यालयाबाहेर नेहमी ढोल ताशे आणि फटाके यांच्यासह कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळतो. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळत होतं. त्यामुळे नेहमीच या ठिकाणी जल्लोषाचं वातावरण होतं. या निवडणुकीतही महायुतीला चांगल्या जागा मिळतील अशी अपेक्षा असल्याने भाजपाच्या नेत्यांनी नेहमीप्रमाणे जल्लोषाची तयारी केली होती; मात्र महाराष्ट्रातील आतापर्यंतची परिस्थिती पाहता भाजपाच्या कार्यालयाबाहेर जल्लोषाचं वातावरण नाही. जल्लोष करण्यासाठी आणलेले कार्यकर्ते खुर्च्यांवर बसून आहेत. भाजपाची गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशी स्थिती पाहायला मिळत आहे. याउलट मुंबईत ठाकरे गटात जल्लोष सुरू आहे असं सगळीकडे चित्र आहे.