मुंबई Sanjay Raut On Pm Modi : राजदचे नेते लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना "नरेंद्र मोदी यांना कोणताच परिवार नाही," असा हल्लाबोल केला होता. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "ए देश मेरा परिवार है" अशी घोषणा देत लोकसभा निवडणुकीला सुरुवात केली. लालू प्रसाद यादव यांच्या टीकेनंतर भाजपातील नेत्यांनी 'नरेंद्र मोदी परिवार' अशी मोहीम सुरू केली आहे. त्यावर आता उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. "तुमचा परिवार म्हणजे लूटमार करणाऱ्यांचा आहे," अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
तुमच्या परिवारात मणिपूर येत नाही का? :"कालच त्यांना आम्ही प्रश्न विचारला आहे. तुमच्या परिवारामध्ये मणिपूर येत नाही का? मणिपूर अजूनही जळतंय, धुमसत आहे. तिथे महिलांवर अत्याचार होत आहेत. मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढली जात आहे. अनेक कुटुंबं रस्त्यावर आली आहेत. लोकांना रस्त्यावर मारलं जातंय. कित्येक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. मग हे मणिपूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परिवारात येत नाही का ?," असा सवाल उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे.
काश्मीरी पंडितांची घर वापसी कधी? :पुढं बोलताना संजय राऊत म्हणाले की, "2014 साली आणि 2019 साली तुम्ही आश्वासन दिलं होतं की, आम्ही काश्मीरी पंडितांची घर वापसी करू म्हणून, पण अजूनपर्यंत काश्मीरी पंडितांची घरवापसी झालेली नाही. ते वाट बघत आहेत. मग ते काश्मीरी पंडित तुमच्या परिवारात येत नाहीत का ?," असा खोचक सवाल संजय राऊत यांना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला आहे.
तुमचा परिवार लुटमार करणाऱ्यांचा :"तुमचा परिवार म्हणजे मूठभर धनदांडग्यांचा, श्रीमंतांचा तुमचा परिवार आहे. तुमचा परिवार म्हणजे लूटमार करणारे, पक्ष फोडणाऱ्यांचा परिवार आहे. आता हे सर्वांना कळलं आहे की, ते 'परिवार' या गोंडस नावाखाली लोकांकडून मतं मागत आहेत. पण यावेळी तुमच्या या भूलथापांना सामान्य जनता बळी पडणार नाही," असंही संजय राऊत म्हणाले. "देशातील 140 करोड जनता ही तुमचा परिवार नसून, ज्यांना तुम्ही विमानतळ विकलाय, एलआयसी विकलीय, मोठमोठ्या कंपनी विकल्या तो तुमचा परिवार आहे. सामान्य जनता आणि देशातील गोरगरीब लोकं ही तुमच्या परिवारातील हिस्सा नाहीत." असा जोरदार प्रहार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला.
देशातील 80 कोटी जनतेला भिकेला लावलं :"80 कोटी जनतेला पाच किलो मोफत धान्य देऊन तुम्ही त्यांना भिकारी बनवलं आहे. वर्षाला 2 कोटी रोजगार देणार होते, ही तुमची घोषणा होती. परंतु त्यात तुम्ही अयशस्वी ठरला आहात. पाच किलो मोफत धान्य देऊन 80 कोटी जनतेला तुम्ही भीक मागायला लावलं आहे, भिकारी केलं आहे. त्या 80 कोटी जनतेच्या हाताला किती रोजगार दिला आहे?," असा सवाल संजय राऊत यांनी मोदी सरकारला विचारला आहे. तसेच "2014 साली 'मै चौकीदार हू...' असं म्हणून तुम्ही सत्तेवर आला होता. आता 2024 साली 'देश मेरा परिवार...' असा नारा दिला आहे. पण देशातील गोरगरीब जनता आता तुमच्या परिवाराला थारा देणार नाहीत," अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
हेही वाचा :
- "महात्मा फुले यांनी ब्रिटिशांच्या दरबारी जाऊनच शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, पण आता..."- संजय राऊत
- "मुंबई, महाराष्ट्रच नाही तर दिल्लीही तुम्हाला आमच्यामुळं दिसली"; आशिष शेलारांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर