मुंबई Maharashtra MLC Polls : मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत उबाठा गटाचे नेते अनिल परब यांचा विजय झाला. लोकसभा निवडणुकीनंतर ही निवडणूक दोन्ही बाजुनं प्रतिष्ठित करण्यात आली. भाजपा विरुद्ध उबाठा गट अशी ही थेट लढत होती. प्रतिष्ठित केलेल्या या लढतीमध्ये उबाठा गटाचे उमेदवार अनिल परब यांनी भाजपाचे उमेदवार किरण शेलार यांचा पराभव केला आहे.
अनिल परब यांचा मोठ्या मतांनी विजय :मुंबई पदवीधर मतदार संघाची निवडणूक अतिशय चुरशीची झाली होती. उबाठा गटाकडून या निवडणुकीसाठी अनिल परब यांना रिंगणात उतरवण्यात आलं. तर भाजपाकडून किरण शेलार यांना उमेदवारी देण्यात आली. लोकसभा निवडणुकीत राज्यात तसेच मुंबई भाजपाचा झालेला पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. या कारणानं या निवडणुकीत किरण शेलार यांना निवडून आणण्यासाठी खुद्द देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवण्यात आली. कुठल्याही परिस्थितीमध्ये किरण शेलार यांचा विजय होणार, असा ठाम विश्वास भाजपाच्या मुंबई नेत्यांना होता. तर दुसरीकडं पदवीधर मतदार संघासाठी ही निवडणूक होत असल्यानं यामध्ये वकील अनिल परब विजयी होतील, असा ठाम विश्वास ठाकरे गटाच्या नेत्यांना होता. निवडणुकीच्या दिवशीही मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी दोन्ही बाजुनं अथक प्रयत्न झाले. अखेर सोमवारी झालेल्या मतमोजणीमध्ये अनिल परब यांना 44,791 मतं मिळाली तर भाजपाचे किरण शेलार यांना 18,771 मतं मिळाली. अनिल परब यांचा 26,020 मतांनी विजय झाला आहे.