नांदेड- केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बायोगॅस प्रकल्प योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील अहिल्यानगर आणि नांदेड जिल्ह्यांतील दोन शेतकऱ्यांना थेट दिल्ली दरबारी बोलावणं आलंय. येत्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी या दोन्ही शेतकऱ्यांचा सत्कार राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात पार पडणार असल्याने या शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील सायाळ येथील रत्नाकर ढगे या 32 वर्षीय युवा शेतकऱ्यानं 2021-22 साली केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बायोगॅस योजनेचा लाभ घेतल्याने शासकीय लाभार्थी म्हणून त्यांची निवड झालीय. येत्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार असल्याचं निमंत्रण पत्रिका पोस्टाद्वारे मिळाल्याचं ढगे यांनी "ई टीव्ही भारतशी" बोलताना सांगितलंय.
20 एकर शेतात सेंद्रिय पद्धतीने शेती : लोहा तालुक्यातील सायाळ येथील रत्नाकर ढगे हा 32 वर्षीय युवा शेतकरी आपल्याकडील 20 एकर शेतात सेंद्रिय पद्धतीने शेती करतोय. सेंद्रिय शेतीबद्दल देखील तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करतोय. आपल्याकडील शेतात ढगे हा शेतकरी हळद, बाजरी, गहू अशा अनेक पिकांची लागवड करीत चांगले उत्पन्न देखील घेतोय. सेंद्रिय शेती करणाऱ्या आणि इतरही शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणाऱ्या ढगे या शेतकऱ्याला अनेक पुरस्कारदेखील मिळालेत.
शेतात खत म्हणून गाईच्या शेणाचा वापर :शेतकरी रत्नाकर ढगे यांच्याकडे 20 एकर शेती असून, 20 गाई आहेत. गाईच्या शेणाचा वापर शेतात खत म्हणून केला जातो. मात्र मोठ्या प्रमाणात शेण उपलब्ध असल्याने याचा वापर अजून कशासाठी करता येईल, असा विचार करीत असतानाच सरकारची राष्ट्रीय बायोगॅस प्रकल्प योजनेची माहिती मिळाली आणि 2021-22 साली ढगे यांनी या योजनेचा लाभ घेतला. या योजनेचा शेतीला मोठा फायदा होत असून, पैशाचीदेखील बचत होत असल्याचं रत्नाकर ढगे यांनी सांगितलंय. राष्ट्रीय बायोगॅस प्रकल्पाचा उपयोग घरातील स्वयंपाक बनवण्यासाठी तसेच गरम पाणी, त्याच बरोबर घरातील लाईट गेल्यानंतर हाच बायोगॅसचा वापर गॅस कंदिलासाठी करीत असल्याचं सांगत बायोगॅसमधून निघणारी सिलेरीला एका पाईपद्वारे शेतीत सोडण्यात आल्याने याच फायदादेखील शेतीला होत असल्याचं ढगे यांनी सांगितलंय.