कोल्हापूरTwo brothers died Koparde village :जिल्ह्यातील कोपार्डे ता. शाहूवाडी येथील कडवी नदीजवळ शेतात तणनाशक मारण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी अंत झाला. सुहास कृष्णा पाटील तसंच स्वप्नील कृष्णा पाटील अशी सख्या भावांची नाव आहेत.
दोघांचाही दुर्दैवी मृत्यू :मिळालेल्या माहितीनुसार, सुहास तसंच स्वप्नील हे दोन भाऊ भाताची रोपे लावल्यानंतर शेतात मारण्यासाठी गेले होते. तणनाशक मारत असताना सुहासला विजेच्या तारेचा धक्का लागून तो शेतात पडला, तर स्वप्नील त्याला काय झालं, असं म्हणत त्याच्या जवळ गेला असता त्यालाही विजेचा धक्का बसला. त्यावेली दोघे भाऊ शेतात पडले. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोन्ही मुले घरी का आली नाहीत, याची माहिती घेण्यासाठी वडील कृष्णा पाटील तिथं गेले असता दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्यानं त्यांना धक्काच बसला. त्यांनी आरडाओरडा केल्यावर गावातील लोकांनी धाव घेत त्यांना आधार दिला. दोन्ही काम करणारी मुलं काळानं हिरावून घेतल्यानं वडील हताश झाले.
पोलिसांकडून घटनेचा पंचनामा : घटनेचा पंचनामा केल्यानंतर शाहूवाडी पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत. आपली दोन्ही मुलांची बातमी त्यांच्या आईला समजताच त्यांनी मोठ्यानं टोह फोडला. तसंच सुहासच्या पत्नीचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. दोन्ही मुलांच्या मृत्यूनं संपूर्ण पाटील कुटुंबच उद्ध्वस्त झालं आहे. जिवंतपणी मुलांना अग्नी देण्याची वेळ वडिलांवर आली. दोघंही मितभाषी स्वभावाचे असल्यानं गावासह पंचक्रोशीत दोघा भावांचा मोठा मित्र परिवार आहे. सुहास आणि स्वप्नील यांच्या मृत्यूनं अनेकांना धक्का बसला.
सर्व्हिसिंग सेंटर चालवून कुटुंबाला हातभार :सुहास आणि स्वप्निल पाटील यांचा गाडी सर्विसिंग सेंटरचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय सांभाळत घरची शेतीची सांगड घालत दोघा भावांनी कुटुंबाला हातभार लावला होता. सुहासचं नुकतंच लग्न झालं होतं. तो भावाला शेती आणि व्यवसायात मदत करत होता. मात्र, दोघांच्या दुर्दैवी मृत्यूनं वडील कृष्णा पाटील यांच्यावर मुलांना अग्नी देण्याची वेळ आली. या दुर्दैवी घटनेनं शाहूवाडी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.