ठाणे : भिवंडी शहराची तहान भागवणारा वऱ्हाळा तलाव मृत्यूचा सापळा बनत असल्याची चर्चा सुरू असतानाच या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं शांतीनगर परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. गुलाम मुस्तफा अन्सारी (१३), शेख साहील पीर मोहमद (१०) आणि दीलबर रजा शमशुल्ला (१२) तिघेही रा.शांतीनगर,पिराणी पाडा अशी बुडून मृत्यू झालेल्या शाळकरी मुलांची नावं आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघेही मुले भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीतील पिरानी पाडा परिसरातील वेगवेगळ्या कुटुंबात रहमत मदिना मस्जिदीजवळ राहत होते. तिघेही मित्र आहेत. दरम्यान बुधवारी रोजी दुपारी १ ते दीड वाजताच्या सुमारास हे तिघेही घराबाहेर खेळण्यासाठी निघाले होते. मात्र बराच वेळ होऊनही तिघेही घरी न परतल्यानं तिघांच्याही कुटुंबीयांनी शांतीनगर पोलीस ठाणे गाठून याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देताच पोलिसांनी तिघांना कोणीतरी अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याबाबत गुन्हा नोंदवला होता.
पोलिसांनी गुरुवारी सकाळपासून या तिघांचा शोध सुरू केला असता गुलाम याचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी स्थानिकांना वऱ्हाळा तलावात दिसून आला. त्यानंतर भिवंडी महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस प्रशासनानं अन्य दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता त्यांचाही मृतदेह रात्री उशिराने सापडला. मृत तिघेही मित्र पोहण्यासाठी वऱ्हाळा तलावात गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोहताना तलावातील खोलीचा अंदाज न आल्यानं तिघांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचंही सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तीनही मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करुन येथील शासकीय इंदिरा गांधी रुग्णालयात शवविच्छेदनाकरता पाठवले. याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास भिवंडी शहर पोलीस करत आहेत.
हेही वाचा..
- पोहण्याचा मोह जिवावर बेतला; तलावात बुडून दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू
- लाडक्या बाप्पाला निरोप देताना काळाचा घाला; दोघांचा पूर्णा नदी बुडून मृत्यू - Two Drowned In Purna River
- कवर्धा येथील राणी दहरा धबधब्याच्या पाण्यात बुडून नागपूरच्या इंजिनीअरचा मृत्यू - Nagpur Engineer Death