महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांच्या पीएला धमकी; 20 कोटी खंडणीची मागणी, गुन्हा दाखल - सुरेश वाडकर यांच्या पीएला धमकी

Suresh Wadkar Extortion Case : प्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांनी खरेदी केलेल्या भूखंडाची पाहणी करायला त्यांचे स्वीय सहाय्यक गेले असता त्यांच्याकडे खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 8, 2024, 11:06 AM IST

Updated : Feb 8, 2024, 12:33 PM IST

जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक, उपनगर पोलीस ठाणे

नाशिक Suresh Wadkar Extortion Case : प्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांनी नाशिकरोड मुक्तीधाम शेजारील खरेदी केलेल्या भूखंड खरेदीला वेगळीच कलाटणी मिळालीय. त्या जागेवर पाहणी करण्यासाठी वाडकर यांचे स्वीय सहाय्यक गेले असता त्यांना दुचाकीवर आलेल्या दोघा युवकांनी धमकावत दरगोडे यांच्यासाठी पंधरा कोटी आणि गॅंगसाठी पाच कोटीच्या खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिलीय. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी दिली.

खंडणी सोबत जीवे मारण्याची धमकी : गायक सुरेश वाडकर यांचे स्वीय सहाय्यक असलेले तक्रारदार मुनीराज मीना हे मंगळवारी दुपारच्या सुमारास वाडकर यांची मुक्तीधाम जवळील भूखंडाची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी तिथं वाडकर यांनी नेमलेला खासगी सुरक्षा रक्षक बाहेर गेलेला होता. तेवढ्यात तिथं नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरुन दोन अनोळखी युवक आले. त्यांनी मीना यांना "तू इथं कशाला आला, सेटलमेंट होईपर्यंत यायचं नाही, असं म्हणून शर्टची कॉलर पकडली, आम्ही नाना कंपनीची माणसं असून, परत इथं दिसला तर तो तुझा शेवटचा दिवस राहील," असं धमकावत दरगोडे यांच्यासाठी पंधरा कोटी व गॅंग साठी पाच कोटींच्या खंडणीची मागणी केली," अशी तक्रार मीना यांनी दिली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्या दुचाकीस्वारांचा शोध घेत आहेत.


नेमकं प्रकरण काय :प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी 2008 मध्ये नाशिकरोड मुक्तीधाम शेजारील सर्व्हे नंबर 7/13 अ 66 आर ही स्थावर मालमत्ता अजित दरगोडे, राजेश दरगोडे यांच्याकडून शहरात संगीत विद्यालय सुरु करण्यासाठी विकत घेतली. मात्र या व्यवहारात फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानं सुरेश वाडकर यांनी संशयित सुधीर बोडके, राजेश दरगोडे, अजित दरगोडे, हेमंत कोठीकर आणि इतरांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल केला. सध्या वाडकर यांच्याकडं त्या भूखंडाचा ताबा असून त्या जागेवर अतिक्रमण होऊ नये म्हणून सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आलीय.


दादा मला वाचवा : काही दिवसापूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गायक सुरेश वाडेकर हे एकाच मंचावर होते. तेव्हा वाडेकर यांनी, "नाशिकच्या तरुणांमध्ये खूप टॅलेंट आहे. इथली अनेक मुलं माझ्याकडे मुंबईला गाणं शिकायला येतात. त्यांचा तो त्रास कमी व्हावा म्हणून नाशिकमध्ये एक जागा घेऊन तिथं संगीत शाळा करायची आहे. मात्र जागेचं व्यवहार ज्ञान नसल्यानं माझी फसवणूक झाली. अजित दादांना हे माहितीये. तसंच यासाठी भुजबळ यांनीदेखील मला खूप मदत केलीय, दादा आता 90 टक्क्यांपर्यंत मी जवळ आलोय. 10 टक्के काम का होत नाही, हे मला कळत नाही. हे दुःख आहे माझं. दादांनी आता जरा मनावर घेतलं तर ही शाळा सुरु होऊ शकते. जसं म्हणतात काका मला वाचवा तसं मी म्हणेन दादा मला वाचवा," असं वाडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून आर्जव केलं होतं.

हेही वाचा :

  1. "पंतप्रधानांनी 'हृदय में श्रीराम' गीत शेअर करणं हा प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद": सुरेश वाडकर यांची 'ईटीव्ही भारत'ला एक्स्लुझिव्ह प्रतिक्रिया
  2. आता ८० वर्षाच्या व्यक्तींनी मार्गदर्शन करावे, अजित पवारांचा शरद पवारांना टोला
Last Updated : Feb 8, 2024, 12:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details