मुंबई : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील 'रॉकी भाई' म्हणजेच सुपरस्टार यश आज 8 जानेवारी रोजी त्याचा 39वा वाढदिवस साजरा करत आहे. 'केजीएफ'द्वारे यशनं फक्त भारतातच नाही, तर जगभरात नाव कमावलं. यश आज सुपरस्टार आहे, मात्र यासाठी त्यानं खूप संघर्ष केला. त्याचा मार्ग खूप कठिण असून त्यानं हार मानली नाही. यशचे वडील अरुण कुमार गौडा हे कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळमध्ये बंगळुरूत, महानगर परिवहन महामंडळाचे बस चालक होते. याशिवाय त्याची आई ही गृहिणी होती. बस ड्रायव्हरचा मुलगा होण्यापासून ते सुपरस्टार बनण्यापर्यंत यशची कहाणी प्रेरणादायी आहे. आज या विशेष दिवशी आम्ही, तुम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती देणार आहोत.
यशला मिळालं 'या' चित्रपटामधून स्टारडम : कन्नड सुपरस्टार यशचा जन्म 8 जानेवारी 1986 रोजी कर्नाटकातील हसन शहरातील बोवनहल्ली गावात झाला. एकेकाळी पूर्ण दिवस काम करून 50 रुपये कमावणारा यश आज कन्नड चित्रपटसृष्टीत अव्वल कलाकारांपैकी एक आहे. यशचे खरे नाव 'नवीन कुमार गौडा' असून त्याला लहानपणापासूनच चित्रपटसृष्टी आकर्षित करत होती. त्यानं 2008 साली 'रॉकी' चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. 'रॉकी' चित्रपटानंतर यशला लोक पसंत करू लागले. त्याला चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. यानंतर त्यानं 'गोकुला', 'कल्लारे सांथे', 'तमासू', 'मोडालस्सा', 'राजधानी', 'किराथाका', आणि 'लकी' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. मात्र यशला ओळख 2013 साली प्रदर्शित झालेल्या 'गुगली' चित्रपटातून मिळाली. हा चित्रपट त्याच्यासाठी जॅकपॉट लागला. या चित्रपटानंतर यशची गणना आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये होऊ लागली. यानंतर यशनं आपल्या करिअरमध्ये कधीच मागे वळून पाहिले नाही.
'केजीएफ'मुळे जगभरात ओळख मिळाली : यशचा 2018मध्ये रिलीज झालेल्या 'केजीएफ'नं जबरदस्त कमाई केली. या चित्रपटातून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवली. 'केजीएफ' चित्रपटाद्वारे त्यानं जगभरात ओळख निर्माण केली. याशिवाय त्यांचा 'केजीएफ 2' देखील चित्रपट प्रेक्षकांना खूप पसंत पडला. तसेच 'केजीएफ 3'बद्दल देखील चाहत्यांना लवकरच अपडेट मिळेल. सध्या यश हा त्याच्या 'टॉक्सिक' चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट 10 एप्रिल 2025 रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे.
यशचं वैयक्तिक आयुष्य : दरम्यान एका रिपोर्टनुसार यश एका चित्रपटासाठी 30 कोटी रुपयांपर्यंत फी घेतो. आता यश आपल्या कुटुंबाबरोबर लक्झरी लाइफ जगतो. यशनं 9 डिसेंबर 2016 रोजी बंगळुरू येथे प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री राधिका पंडितबरोबर लग्न केलं. यशच्या लग्नात कर्नाटकातील सेलिब्रिटी आणि राजकारणी उपस्थित होते. तसेच या जोडप्याला दोन मुले आहेत. अनेकदा यश हा आपल्या पत्नी आणि मुलांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.
हेही वाचा :
- यश त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना देईल सरप्राईज, 'टॉक्सिक'चं नवीन पोस्टर रिलीज
- 'अल्फा' चित्रपट यंदा ख्रिसमसला रिलीज होणार, यशराज फिल्म्सची घोषणा - Alpha release on Christmas
- 'केजीएफ' स्टार यशच्या 'टॉक्सिक' चित्रपटाची लेटेस्ट अपडेट, हॉलिवूड स्टार करणार 'रॉकी भाई'बरोबर अॅक्शन - KGF star Yash Toxic movie