अमरावती Threat to Bachu Kadu : अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी, जीवाला धोका आहे, अशा संदर्भातील पत्र 6 मे रोजी अमरावतीच्या पोलीस अधीक्षकांना दिल्याचं समोर आलं आहे. आमदार बच्चू कडूंच्या या पत्रामुळं खळबळ उडाली असून त्यांच्या संदर्भात अनेक अफवा देखील पसरवल्या जात असल्याचा उल्लेख या पत्रामध्ये स्वतः आमदार बच्चू कडू यांनी केला आहे.
बच्चू कडू यांचं पोलीस अधीक्षकांना पत्र :अचलपूर परिसरातील प्रवासी निवाऱ्यालगत भाजीपाला विक्री करणाऱ्या एका व्यक्तीच्या जवळ काळसर रंगाची तसंच त्यावर लाल रंगाचा पट्टा असणाऱ्या दुचाकीवरून एक व्यक्ती तोंडाला रुमाल बांधून 4 मे रोजी आली होती. त्यानं असं सांगितलं होतं की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कट्टर कार्यकर्ता असून गडचिरोली येथून आलो आहे. माझा नक्षलवाद्यांशी जवळचा संबंध आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्याप्रमाणं दिघेंना संपवलं तसं शिंदे साहेब बच्चू कडूला संपवणार नाहीत, तर मी स्वतः बच्चू कडूला संपवणार. असं सांगत त्याच्या मोबाईल मध्ये त्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच आणखी काही राजकीय नेत्यांसोबत असणारे फोटो देखील दाखवले असल्याचं आमदार बच्चू कडू यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या पत्रात नमूद आहे.
मौका देख के कडू का चौका मारेंगे :चांदूर बाजार शहरातील एका हॉटेलमध्ये तीन इसमांच्या संवादा दरम्यान मौका देख के कडू का चौका मारेंगे असं बोललं गेलं. ज्यांनी हा संवाद ऐकला त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. सध्या जे काही राजकीय वातावरण आहे, त्यामुळं माझ्या जीविताला धोका असल्याचं जाणवत असून या दोन्ही प्रकरणांची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तींना जेरबंद करण्यात यावं, अशी मागणी देखील बच्चू कडू यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
अपघाताची अफवा :माझा अपघात झालाय अशा प्रकारचे नागरिकांचे फोन येत असून अपघात झाल्याची अफवा कोणीतरी पसरवत आहे. माझ्या अपघाताच्या अफेमुळं मतदार संघात खळबळ उडविली जात आहे. या प्रकाराला त्वरित आळा बसावा. माझ्या जीविताला धोका उद्भवल्यास याचे पडसाद महाराष्ट्रभर पेटण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असं देखील आमदार बच्चू कडू यांनी पत्रात लिहिलं आहे.
हेही वाचा
- पुण्यात 'जागतिक योग दिवस' उत्साहात साजरा; मंत्री मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील यांचा सहभाग - International Yoga Day 2024
- आंतरराष्ट्रीय योग दिन विशेष : आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळेनं दिला निरोगी आरोग्याचा कानमंत्र - International Yoga Day 2024
- "हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले" या पंक्तींप्रमाणे आज आपल्या हृदयाची अवस्था..; ज्येष्ठ गायक हृदयनाथ मंगेशकर - Shivacharitra Ek Soneri Paan song
- निवडणूक आयोगाने मतदार यादीतून १२ हजार नावे वगळली, ॲड. अनिल परब यांचा आरोप - Anil Parab On Election Commission