महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 13, 2024, 12:32 PM IST

Updated : Feb 13, 2024, 1:25 PM IST

ETV Bharat / state

तुरुंगात जाण्यापेक्षा भाजपात गेलेलं बरं; विनायक राऊतांचा अशोक चव्हाणांना टोला

ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण काँग्रेसमधून बाहेर पडले. आज त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधलाय. "तुरुंगात जाण्यापेक्षा भाजपात जाणं कधीही चांगलं," असा टोला त्यांनी लगावलाय.

ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत
ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत

ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत

रत्नागिरी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. ते भाजपामध्ये आज प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या प्रवेशाने आम्हाला कोणताही धक्का बसला नाही. कारण, गेल्या सहा महिन्यांपासून त्यांची पावलं लक्षात येत होती, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. ते रत्नागिरीत आज मंगळवार (दि. 13 फेब्रुवारी)रोजी माध्यमांशी बोलत होते.

तुरुंगात जाण्यापेक्षा भाजपामध्ये गेलेलं बरं : "अशोक चव्हाण यांचे वडील मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री होते. यांना स्वतःला दोन वेळा मुख्यमंत्री पद मिळालं. तरीही अशोक चव्हाण यांना भाजपावासी का व्हावं लागलं?" असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. "केंद्र सरकारने ज्याप्रमाणे एक एक नेत्याच्या मागे शुक्लकाष्ट लावलं आहे, ज्या वेगवेगळ्या चौकशा लावल्या आहेत. त्यामुळे तुरुंगात जाण्यापासून वाचण्यासाठी तात्पुरतं का होईना भाजपावासी झालेलं परवडेल अशी मन:स्थिती सर्वांनी केलेली आहे." असंही राऊत यावेळी म्हणाले.

आघाडी मजबूतच राहणार : "अशोक चव्हाण यांच्या जाण्याने आघाडीच्या जागा वाटपाबाबत कोणताही परिणाम होणार नाही. कालपरवापर्यंत महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये अशोक चव्हाण पुढे होते. पण आज ते गेलेले आहेत. परंतु, त्यामुळे फरक काही पडणार नाही. आघाडी मजबूतच राहणार आहे," असं खासदार विनायक राऊत यावेळी म्हणाले. राज्यसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे घोडाबाजार असणार आहे असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

ज्यांना ज्यांना भाजपामध्ये जायचं आहे त्यांनी नक्की जावं : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा एवढं वाढलं तरी देखील इतर पक्षातील नेत्यांना भाजपामध्ये घेऊन पक्षाला सावरावं लागतं, हे नरेंद्र मोदी साहेबांचं दुर्दैव आहे, असं म्हणत राऊत यांनी भाजपावर टीका केली. तसंच, ज्यांना ज्यांना भाजपामध्ये जायचं आहे त्यांनी नक्की जावं, असंदेखील राऊत यावेळी म्हणाले. दरम्यान, राऊतांनी यावेळी भाजपाला अनेक मुद्यांवर टार्गेट केलं.

Last Updated : Feb 13, 2024, 1:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details