मुंबई-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात ऐतिहासिक आणि क्रांतिकारी योजना ठरलीय. महायुतीला पुन्हा सरकारमध्ये आणण्यास ही योजना गेमचेंजर ठरल्याचे बोलले जातंय. दरम्यान, निवडणुकीपूर्वी महायुतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देऊ, असे आश्वासन दिलं होतं. मात्र अद्यापपर्यंत 2100 रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला नाही, तर दुसरीकडे या महिन्याचा हप्ता 26 तारखेनंतर येण्यास सुरुवात होणार आहे. पण आता या योजनेबाबत एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट महिला आणि बाल विकासमंत्री अदिती तटकरे यांनी दिलीय.
पैसे परत घेणार नाही : या योजनेत ज्या लाभार्थी महिला आहेत आणि ज्या योजनेच्या निकषात बसत नाही आणि ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांच्या वर आहे किंवा ज्यांच्या घरी चारचाकी गाडी आहे. ज्या महिला नियमात बसत नाहीत, अशा महिलांनाही या योजनेचा लाभ घेतल्याच्या घटना समोर आल्या होत्या. मात्र यानंतर काही महिलांनी या योजनेतील पैसे सरकारला परत केले होते. पण सरकारने दिलेले पैसे कुठल्याही लाडक्या बहिणींकडून परत घेणार नाही किंवा आम्ही पैसे परत घेतले नाहीत. तसेच याबाबत कुठलाही शासकीय स्तरावर निर्णय झालेला नाही. अशी कुठलीही महायुतीमध्ये चर्चा झालेली नाही, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलीय. आज त्यांनी मुंबईत माध्यमांची संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या.