मुंबई Salman Khan House Firing : बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता सलमान खान याच्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं गुजरातच्या भूज (कच्छ) मधील माता नो मठ या मंदिरातून अटक केलीय. विकी साहब गुप्ता आणि सागर श्रीजोगेंद्र पाल अशी अटक केलेल्या आरोपींची नावं असून दोघंही बिष्णोई टोळीशी संबंधित असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलीय. तसंच दोघंही बिहार राज्यातील चंपारण्य येथील रहिवासी आहेत. हे दोघं आरोपी मुंबईत कधी आले आणि पुढं त्यांनी गोळीबाराचा कट कसा रचला, याबाबत माहिती समोर आलीय.
गोळाबार केल्यानंतर गुजरातला काढला पळ : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी आपर्टमेंटमधील घरावर रविवारी पहाटे 4 वाजून 50 मिनिटांनी दोघांनी गोळीबार करुन पळ काढला होता. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन गुन्हा पुढील तपासासाठी गुन्हे शाखेकडं वर्ग करण्यात आला. वांद्रे बँडस्टँडमार्गे दुचाकीवरुन आल्यानंतर सागर पाल आणि विक्की गुप्ता यांनी गॅलेक्सी अपार्टमेंटच्या दिशेनं पाच राउंड फायर करुन पळ काढला. त्यानंतर सागर पाल आणि विक्की गुप्ता यांनी येथील माउंट मेरी चर्च जवळ दुचाकी सोडून रिक्षानं पश्चिम रेल्वेचं वांद्रे रेल्वे स्थानक गाठलं. वांद्रे रेल्वे स्थानकावरुन या दोघांनी सकाळी 5 वाजून 8 मिनिटांची बोरिवलीच्या दिशेनं जाणारी लोकल पकडली. मात्र, हे दोघंजण मध्येच सांताक्रूझ रेल्वे स्थानकावर उतरले. सांताक्रुझ रेल्वे स्थानकातून सव्वापाचच्या सुमारास बाहेर पडून हे दोघं वाकोल्याच्या दिशेनं चालत गेले. येथून त्यांनी एक टॅक्सी पकडली. टॅक्सीनं मुंबईच्या वेशीपर्यंत जात तेथून बसनं गुजरातच्या सूरत, अहमदाबाद मार्गे भूजमध्ये पोहचले. येथील आशापुरा मातेच्या मंदिरात ते लपून बसले होते.
गोळीबार करण्यापूर्वी केली होती रेकी : गुन्ह्यातील तांत्रिक पुराव्यांवरुन गुन्हे शाखेनं आरोपी पाल आणि गुप्ता यांचा माग सुरुच ठेवला. दोघंही भूजमध्ये असल्याचं समोर येताच गुन्हे शाखेनं पोलीस पथक भूजला रवाना केलं. आरोपी वास्तव्यास असलेल्या परिसर माहितीचा नसल्यानं आणि आरोपींकडं पिस्तुल असण्याच्या शक्यतेतून गुन्हे शाखेनं भूज पोलिसांची मदत घेत दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. बिहार राज्यातील चंपारण्यचा रहिवासी असलेला आरोपी सागर पाल हा हरियाणामध्ये गेला असताना बिश्नोई टोळीच्या संपर्कात आला होता. पुढं त्यानं गुप्ताला टोळीत ओळख करुन दिली. आरोपी पाल आणि गुप्ता 28 फेब्रुवारीला मुंबईत आले. 28 फेब्रुवारी आणि 29 फेब्रुवारीला दोघांनी वांद्र्यात राहून सलमान खानच्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंट्समधील घराची रेकी केली. नंतर 1 मार्चला दोघंही पनवेलला गेले. सलमान खानच्या पनवेलमधील फार्म हाऊस पासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या हरिग्राम गावातील राधाकृष्ण अपार्टमेंटमधील एक फ्लॅट त्यांनी 11 महिन्यांच्या भाडेकरारावर घेतला.