shivrajyabhishek din 2024 : आज 6 जून! छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा दिवस. १६७४ साली आजच्याच दिवशी मराठी मुलुखात पहिल्यांदाच महाराजांचा 'रयतेचा राजा' म्हणून चैतन्यमय सोहळा पार पडला. देशाच्या इतिहासातलं हे लखलखतं सोन्याचं पानच! मुघलांच्या जुलमी राजवटीनं संपूर्ण भारतभूमी पिचलेली असताना, देशातील तत्कालीन राजे मुघलांना शरण जात असताना मराठी प्रांतात मात्र शिवाजी महाराजांनी दिल्लीच्या तख्तापुढं न झुकता स्वराज्याची निर्मिती करुन नवा इतिहास घडवला. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ म्हणजेच ६ जून १६७४ ला छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम स्वराज्यातून, सह्याद्रीच्या कडे-कपाऱ्यातून शेर शिवराजांचा जयघोष झाला. राज्याभिषेकावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी 'छत्रपती' हे पद धारण केलं. 'छत्रपती' म्हणजे आपल्या प्रजेवर सतत मायेचं छत्र धरणारा, प्रजेच्या सुखासाठी सर्वस्व पणाला लावणारा, प्रजेच्या सुरक्षेची, पालन पोषणाची जबाबदारी घेणारा, काळजी वाहणारा राजा. महाराजांनी यासाठी 'अष्टप्रधान मंडळा'ची स्थापना करुन रयतेच्या सुखसमृद्धीसाठीचं पहिलं पाऊल टाकलं. या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये महाराणी म्हणून सोयराबाई आणि युवराज म्हणून छत्रपती संभाजीराजे महाराजांचाही अभिषेक करण्यात आला.
स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर शिवराज्याभिषेकचा भव्य सोहळा किमान लाखभर लोकांनी 'याचि देही... याचि डोळा' अनुभवला. देशाविदेशातील विद्वान पंडित, स्वराज्यातील आणि दुसऱ्या राज्यातील प्रतिनिधी, विदेशी प्रवासी तसंच व्यापारी आणि सामान्य प्रजाजन, असा हा मोठा समुदाय आपल्या राजाला 'छत्रपती' होताना पाहण्यासाठी हजर होता.
शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे आणि माँसाहेब जिजाबाई यांनी पाहिलेलं स्वराज्यनिर्मितीचं स्वप्न या राज्याभिषेकाच्या निमित्तानं सत्यात उतरलं. भारतात त्याकाळात अनेक राजे रजवाडे होते. मात्र छत्रपती शिवाजी महाराज एकमेव होते ज्यांना राजा बनण्याची संधी वारसा म्हणून मिळाली नाही, तर त्यांनी स्वकर्तृत्व आणि पराक्रमानं मिळवली. शिवाजी महाराजांनी 'छत्रपती' म्हणून रयतेला कसण्यासाठी जमिनी मिळवून दिल्या, पेरण्यासाठी बियाणं दिली आणि कष्टाळू रयतेनं माळरानावर मळा फुलवला. रयतेच्या भाजीच्या देठालाही स्पर्श करु नये, हा आदेश महाराजांनी आपल्या सैन्याला दिला होता. महाराजांनी महसुलाची शिस्त लावली, झेपेल इतकाच कर लावला, सावकारांवर वचक ठेवला, करबुडव्या सावकारांना, लोभी जमीनदारांना सक्तीचा दंड केला, जरबेत राज्य चालवलं आणि जनतेला सुखी केलं.
सैन्यात येणाऱ्या मावळ्यांची कायम मुलाप्रमाणं काळजी घेतली, पराक्रम दाखवणाऱ्या मावळ्यांना कडं, तोडा, घोडा देऊन यथोचित सनम्मान केला. धरती ही देवाची आहे मानून कसणाऱ्यांना ती दिली. गरिबांना दिलेलं वचन कायम पाळलं, सर्वांसाठी एकच न्यायाची भूमिका घेतली, न्यायदानाची स्वतंत्र निरपेक्ष व्यवस्था निर्माण केली. न्यायदानात ढवढवळ करणाऱ्यांवर महाराजांचा मोठा वचक होता. त्यामुळे 'छत्रपती' शिवाजी महारांजाचा लौकिक हा 'न्यायदाते थोर छत्रपती' असाच होता.