ठाणे : शिक्षणमहर्षी म्हणून नावाजलेले दिवंगत शिवाजीराव जोंधळे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावे असलेल्या स्थावर आणि जंगम मालमत्ता हडप करण्यासाठी कथित बनावट मृत्यूपत्र तयार करण्यात आलं आहे. याप्रकरणी सावत्र आई आणि भावांसह वकील, डॉक्टर अश्या 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खळबळजनक बाब म्हणजे तक्रारदार महिलेसह तिच्या कुटुंबाची संपत्ती हडप करण्यासाठी हत्या केली जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडं कुटुंबाच्या सुरक्षासह न्यायाची मागणी दिवंगत शिवाजीराव जोंधळे यांची मुलगी वर्षा प्रीतम देशमुख यांनी केली.
काय आहे प्रकरण ? :मिळालेल्या माहितीनुसार, "दिवंगत शिवाजीराव जोंधळे यांची मुलगी वर्षा प्रीतम देशमुख (वर्षा शिवाजीराव जोंधळे) या आसनगाव येथील विघ्नहर्ता ट्रस्टच्या अध्यक्ष आहेत. तक्रारदार वर्षा या शिवाजीराव जोंधळे यांच्या दुसऱ्या पत्नीची मुलगी असल्याचं सांगत त्या कायदेशीर वारस असल्याचं मुंबई सिटी सिव्हिल कोर्टनं सिद्ध केलं आहे."
प्रतिक्रिया देताना तक्रारदार वर्षा देशमुख (ETV Bharat Reporter) मृत्यूपत्र बनावट असल्याचा संशय : वर्षा यांच्या माहितीनुसार, "शिवाजीराव जोंधळे यांचे 19 एप्रिल 2024 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पहिल्या पत्नी, त्यांची दोन मुले यांनी त्यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी जबरदस्ती करत कट कारस्थान रचण्यास सुरूवात केली. विशेष म्हणजे दिवंगत शिवाजीराव यांच्या नावे असलेल्या अनेक शेतजमिनी नावावर करण्यासाठी एका मृत्यूपत्राच्या आधारे वारस लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, वर्षा यांनी असे कुठलेही मृत्यूपत्र वडिलांनी तयार करून ठेवल्याचं नसल्यानं सांगितलं. त्यामुळं हे मृत्यूपत्र बनावट असल्याचा संशय आला. "
बनावट मृत्यूपत्र :वर्षा यांच्या माहितीनुसारमृत्यूपत्र बनावट असल्याची खात्री झाल्यावर त्यांनी 13 मार्च 2024 ला हे नोंदणीकृत मृत्यूपत्र नोटरी केल्याचं लक्षात आलं. मात्र, त्यावर असलेली सहीही बनावट असल्याचंदेखील वर्षा यांच्या लक्षात आलं. तसेच वडिलांचा 13 मार्चचा मोबाईल लोकेशनचा डेटा मागवला असता, शिवाजीराव जोंधळे हे 13 मार्च रोजी मुबंई फोर्ट परिसरात गेल्याचं निदर्शनास आलं नाही. त्यानंतर हा सर्व प्रकार आझाद मैदान पोलीस ठाण्यात हद्दीत घडल्यानं वर्षा देशमुख यांनी 31 ऑक्टॉबर रोजी आझाद मैदान पोलीस ठाण्यात धाव घेतली. वडिलांचे मृत्यूपत्र बनवून त्यांची मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची तक्रार पोलिसांना दिली. आझाद मैदान पोलिसांनी पुरावे आणि तांत्रिक बाबीची तपासणी करून सदरचे मृत्यूपत्र, नोटरी वकील, फिटनेस सर्टिफिकेट देणारे डॉक्टर, तसेच वर्षा यांची सावत्र आई, 2 सावत्र भाऊ, 2 साक्षीदार यांची चौकशी केली. तेव्हा पोलिसांनादेखील हे मृत्यूपत्र बनावट असल्याचं निदर्शनास आल्याची माहिती वर्षा देशमुख यांनी दिली.
आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल :दरम्यान, कथित बनावट मृत्यूपत्र बनवून शिवाजीराव जोंधळे यांची संपत्ती हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संशयित त्यांची पहिली पत्नी वैशाली जोंधळे, मुलगा सागर जोंधळे, देवेंद्र जोंधळे, ॲड निलेश मांडवकर, नोटरी वकील टी. सी. कौशिक, फिटनेस सर्टिफिकेट देणारे डॉक्टर अरुण भुते, मृत्यूपत्राचे साक्षीदार किशोर जोंधळे, चैतन्य बडवर यांच्यावर आझाद मैदान पोलीस ठाण्यात ९ डिसेंबर रोजी भारतीय न्याय संहिता कलम 420, 465, 467, 468, 471, 120 ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास करणारे साहाय्यक पोलीस निरिक्षक शहा यांच्याशी संपर्क साधला असता तक्रारदार वर्षा देशमुख यांनी तांत्रिक पुराव्याच्याआधारे गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस पथकाकडून तांत्रिक पुराव्याची तपासणी सुरू आहे. लवकरच या गुन्हयातील तपासणी अंती सत्यता समोर येणार आहे. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आमच्यावर खोटे गुन्हे दाखल : सागर जोंधळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, "या आधी आम्ही या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यामुळं माझ्यासह माझ्या कुटुंबाचा मनात राग धरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. वर्षा देशमुख यांच्या आईसोबत माझ्या वडिलांचं लग्न झालंच नाही. पूर्वी दाखल केलेल्या तक्रारीचा सूड उगवण्यासाठी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत."
हेही वाचा -
- Rahul Gandhi Inherit : राहुल गांधींना मालमत्तेचे वारस घोषित करण्यासाठी महिलेची न्यायालयात धाव
- 15 कोटींच्या मालमत्तेसाठी पती आणि मुलाने तयार केले बनावट मृत्यू प्रमाणपत्र, पाच वर्षांनी कट आला उघडकीस
- Muslim Couple To Remarry: मुलींना संपत्तीत पूर्ण हक्क मिळावा म्हणून 'हा' अभिनेता करणार पत्नीशी पुन्हा लग्न, जाणून घ्या काय आहे प्रकरण