ठाणे Thane Crime News : ठाणे गुन्हे शाखेनं पकडलेला एक चोर इतर चोरांपेक्षा विशेष आहे. या चोराला पकडल्यावर त्यानं पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्यासाठी एका मजल्यावरुन उडीदेखील मारली. अनेक गुन्हे या चोरावर दाखल आहेत. अशा अट्टल चोराला शिताफीनं पडकून गुन्हे शाखेनं तब्बल 22 गुन्ह्यांची उकल केलीय.
वेशांतर करुन पोलिसांनी घेतलं ताब्यात : हा चोर आसामवरुन विमानानं येवून रेकी केल्यावर घरफोडी करत होता. घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या या चोराचं नाव मोईनल अब्दुल मलिक इस्लाम असून हा मूळचा आसामचा होता. मात्र, तो नवी मुंबई इथं राहत होता. मुबंईत येऊन चोरी केल्यानंतर पुन्हा विमानानं प्रवास करुन आसाम व नागालँड राज्यात लपण्यासाठी पळून जाऊन विविध ठिकाणी वास्तव्य करत होता. त्याचा राहण्याचा कोणताही ठोस पुरावा नव्हता. तसंच तो मोबाईल फोनदेखील वापरात नव्हता. त्याचा मोबाईल कायम बंद येत असल्यामुळं पोलीस सुरवातीला गोंधळून गेले होते. तसंच त्यानं ओळख लपविण्यासाठी तो विग घालत होता. हा आरोपी रमजान महिना सुरु असल्यानं त्याच्या आसाम राज्यातील मूळ गावी आला असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेला मिळाली. त्या माहितीप्रमाणे पोलीस आरोपीच्या मूळ गावात सलग पाच दिवस वेशांतर करुन मोटर साययकलवर फिरत होते. पोलिसांनी आरोपीबद्दल माहिती गोळा केली. त्यानंतर मुराजर पोलीस स्टेशन होजाई आसाम यांच्या मदतीनं ठाणे गुन्हे शाखेनं आरोपीला ताब्यात घेतलं.