ठाणे Thane Municipal Corporation Headquarter :ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या दुरुस्तीसाठी आत्तापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र, असं असतानाही या इमारतीला गळती लागली आहे. इतकंच नाहीतर स्ट्रक्चर ऑडिटमध्ये ही इमारत धोकादायक असल्याची माहिती समोर आलीय. मात्र नवीन इमारतीसाठी पालिकेकडं पैसे नसल्यानं पालिका प्रशासन राज्य सरकारच्या मदतीची अपेक्षा ठेवून आहे.
नव्या इमारतीसाठी 727 कोटी रुपये खर्च :ठाणे महानगरपालिका मुख्यालयाची इमारत 35 वर्षे जुनी आहे. 1989 मध्ये तयार केलेली ही इमारत चार मजली असून 3900 चौरस मीटर क्षेत्रफळावर तिचं बांधकाम करण्यात आलंय. नव्या महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या इमारतीसाठी 727 कोटी रुपये खर्च येणार असून यासाठी मंजुरीही मिळालेली आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी राज्य सरकारकडून अडीचशे कोटी रुपये मिळणार आहे. मात्र, तरी देखील जवळपास 500 कोटींचा खर्च महानगरपालिकेला करावा लागणार आहे. पण महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्यानं नवीन इमारत कधी तयार होईल, असा प्रश्न ठाणेकरांना पडलाय.